मॉडेलिंग हे बुध्दिजीवींचे क्षेत्र असून, येथे कमालीची मेहनत करावी लागते, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि पूर्वाश्रमीची मॉडेल नेहा धुपियाने व्यक्त केले. २००२ सालच्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत नेहाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ‘किंगफिशर सुपरमॉडेल ३’ शोची ती सूत्रसंचालक असून, सुपरमॉडेलचा किताब मिळवण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या मॉडेल्सची मार्गदेर्शक देखील आहे. छोट्या पडद्यावरील २० भागांच्या या शोमध्ये मॉडेल-स्पर्धक आव्हानांना सामोरे जात त्यांना दिलेली कार्ये पार पाडताना दिसतील. दंतवैद्य, वकील आणि उद्योगसमुहात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या मॉडेल्ससाठी मॉडेलिंग हे क्षेत्र फार मेहनतीचे असल्याचे नेहा म्हणाली. मॉडेलिंग हे बुध्दिजीवींचे क्षेत्र नसल्याचे म्हणण्यात काही अर्थ नसल्याचे सांगत या क्षेत्रातील काही मुली दंतवैद्य आणि वकील असून कॉर्पोरेट क्षेत्र आणि टेक कंपनीत मोठ्या हुद्यावर असल्याची माहिती तिने दिली. कामाचे अनेक तास, खूप परिश्रम आणि दर दिवशी नवीन बॉस असे हे क्षेत्र आहे. काम करण्यासाठी हे क्षेत्र चांगले नसले, तरी या क्षेत्राबबतच्या बऱ्याच गोष्टी अतिरंजित करून सांगितल्या जातात. चांगल्याप्रकारे काम केल्यास, हे क्षेत्र तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. अन्य क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातदेखील मोठ्याप्रमाणावर स्पर्धा असल्याचे सांगत पूर्णपणे तयारी करूनच या क्षेत्रात उतरण्याचे मार्गदर्शन नेहाने केले. मॉडेलिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी अंगात व्यावसायिकता बाळगण्याबरोबरच नकारात्मकतेला दूर सारत सकारात्मक विचार अंगी बाळगण्याचा सल्ला तिने दिला. अमेरिकेतील एका मॉडेलच्या शरीरावर चट्टे असूनदेखील तिने आत्मविश्वासाच्या जोरावर मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमवल्याचे उदाहरण देत, कमतरतेच्या जाणीवेला दूर सारत आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येय गाठण्याचे आवाहन नेहाने या क्षेत्रात येणाऱ्या तरुणींना केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा