काही दिवसांपूर्वीच ‘मोदी जी की बेटी’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं. तिथपासूनच या चित्रपटामध्ये नेमकं काय असणार? याबाबत चर्चा रंगत होती. अखेरीस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. खरं तर हा एक विनोदी चित्रपट आहे. पण चित्रपटाचं नाव पाहता याबाबत सध्या सोशल मीडियावर अधिकाधिक चर्चा रंगत आहे. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘मोदी जी की बेटी’ चित्रपटामध्ये विक्रम कोचर, तरुण खन्ना, पितोबाश त्रिपाठी आणि अवनि मोदी आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच एडी सिंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चित्रपटाची कथा काहीशी हटके आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आहे.
नवोदीत अभिनेत्री कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. एका पत्रकाराने निर्माण केलेल्या वादामध्ये ही नवोदीत अभिनेत्री अडकते. नवोदीत अभिनेत्री म्हणजे देशाच्या पंतप्रधानाची मुलगी आहे असं तो पत्रकार सगळ्यांना सांगतो.
त्यानंतर ती रातोरात प्रसिद्ध होते. या संपूर्ण कथेवरच हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलरला नेटकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे.
तसेच काही मजेशीर मीम्स ट्विटरद्वारे नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. काही तासांमध्येच चित्रपटाच्या या ट्रेलरला १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अगदी कमी बजेट असलेला हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.