पहाडी आवाज, तरीही गोड गळा.. हे असलेल्या मोहम्मद रफी यांचा बुधवार, २४ डिसेंबर रोजी ९० वा जन्मदिन. रफी हे लौकिकार्थाने आपल्यात नसले तरी असंख्य अजरामर गाण्यांच्या रूपात ते भेटतातच, यापुढेही भेटत राहतील. या गाण्यांशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यामुळे ते अजूनही आपल्यात असल्याचा भास व्हावा, त्या गोष्टी याचि देही याचि डोळा पाहण्याचा नुकताच योग आला. रफी जिथे राहत होते, तेथे आता रफी मॅन्शन (२०वा रस्ता, वांद्रे पश्चिम) नावाची इमारत उभी असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या परिवाराने, विशेषत: त्यांचे जावई मिराज अहमद यांनी एक छोटंसं वस्तुसंग्रहालयच उभारलं आहे!
या छोटेखानी दालनावर एक दृष्टिक्षेप टाकला तरी या गायकाची थोरवी कळावी. रफींना मिळालेला पद्मश्री पुरस्कार सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो. त्याच्याच बाजूला दिसतो तो राष्ट्रपती पुरस्कार. सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायक या नात्याने मिळालेल्या पुरस्कारांच्या बाहुल्या, तसेच त्यांची गाणी असलेल्या सिनेमांच्या रौप्य वा सुवर्णमहोत्सवानिमित्त मिळालेल्या ट्रॉफीज यांची तर मोजदादच नाही. रफींच्या कारकिर्दीचा रौप्यमहोत्सव साजरा झाला त्या वेळी पृथ्वीराज कपूर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला एक रजतपटही आगळावेगळा आहे. या फ्रेमला चांदीच्या २५ मोठय़ा शिक्क्यांनी मढविण्यात आलं आहे व त्या प्रत्येक शिक्क्यावर रफींचे पाश्र्वगायन असलेल्या सिनेमांची नावे कोरण्यात आली आहेत. या दालनात लाँग प्ले रेकॉर्ड्सचा तर मोठा खजिनाच आहे.
हा गायक संगीतसाधनेला किती महत्त्व देत होता, हे लक्षात येतं ते येथे मध्यभागी विराजमान असलेला तबला-डग्गा व तानपुरा पाहून. शेजारीच एक सुबक हार्मोनियमही दिसते आणि रफींना ती भेटीदाखल दिली आहे साक्षात सचिनदेव बर्मन यांनी! रफींच्या रोजच्या वापरातील टेबल-खुर्ची, थर्मास, टेलिफोन, प्लेट, पेन, डायरी आदी वस्तू तर अगदी काल-परवाच्या वाटतात. रफींच्या काही अप्रतिम छायाचित्रांनी व चित्रांनी या दालनाच्या सौंदर्यात भर घातली आहे. सोफ्यावर बसून परस्परांना दिलखुलासपणे हस्तांदोलन करणारे रफी आणि किशोरकुमार एका छायाचित्रात दिसतात. एका सुटीत लंडनच्या घरी गेलेल्या रफींनी त्याच सुमारास तेथे स्टेज शो करण्यासाठी आलेल्या किशोरला आपुलकीने घरी जेवायला बोलावलं होतं. तेव्हाचा हा प्रसन्न मूडचा फोटो म्हणजे दोघांच्या उमदेपणाची साक्षच!
रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. ही रफीवारी आटोपून खाली उतरलो तेव्हा लक्ष गेलं ते पांढऱ्या रंगाच्या एमएमयू १०६७ या फियाटकडे. रफींची अनेक वर्षे सेवा केलेली ही गाडी आजही कदाचित आपल्या मालकाची वाट पाहत असेल. मनात हा विचार आला आणि आठवलं त्यांचं अखेरचं गाणं. अवघ्या ५६व्या वर्षी गेलेल्या या गायकाच्या अखेरच्या गाण्याचे शब्द म्हणजे विचित्र योगायोगच..तेरे आने की आस है दोस्त, शाम फिर क्यूं उदास है दोस्त, मेहकी मेहकी फिजाँ ये कहती है, तू कहीं आसपास है दोस्त..
आज फिर रफी!
रफींवरील प्रेमापोटी स्पंदन आर्ट्स या संस्थेतर्फे दरवर्षी ‘फिर रफी’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. जीवनगाणीची निर्मिती असलेला हा कार्यक्रम बुधवारी संध्याकाळी सहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होत असून तो रफीप्रेमींसाठी विनामूल्य आहे. व्हॉइस ऑफ रफी श्रीकांत नारायण याच्यासह सरिता राजेश यांचा यात सहभाग आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर सुरेश वाडकर यांना रफी अॅवार्डने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण होईल.