Mohammed Shariful islam on Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर तीन महिन्यांपूर्वी एका चोराने जीवघेणा हल्ला केला होता. एक इसम चोरीच्या उद्देशाने सैफच्या मुंबईतील घरात घुसला होता. त्यावेळी त्याने सैफवर चाकूहल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याला अटक केली असून त्याच्याविरोधात खटला चालू आहे. शरीफुल हा बांगलादेशी नागरिक आहे. या खटल्याप्रकरणी त्याची चौकशी चालू असून यामधून अनेक खुलासे झाले आहेत. पोलीस चौकशीत शरीफुल म्हणाला, “सैफवर हल्ला केल्यानंतर तो तिथून पळून गेला आणि त्याने त्याची वेशभूषा बदलली.”
शरीफुलने चौकशीदरम्यान सांगितलं की “मी सैफ अली खानचे चित्रपट पाहिले आहेत. मात्र, त्याच्या घरात असताना तो माझ्या समोर आला तेव्हा मी त्याला ओळखू शकलो नाही. मी त्याचे काही चित्रपट पाहिले असूनही त्याला ओळखू शकलो नाही.
क्लीन शेव्हमुळे मी सैफला ओळखू शकलो नाही : शरीफुल इस्लाम
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल १,६०० पानांचं दोषारोपत्र दाखल केलं आहे. यामध्ये पोलिसांनी शरीफुल इस्लामचा कबुलीजबाब देखील नोंदवला आहे. शरीफुल म्हणाला, मी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी युट्यूबवर एक बातमी पाहिली. त्याद्वारे मला सैफवरील हल्ल्याची माहिती मिळाली. मी सैफ अली खानचे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, त्या रात्री मी त्याला ओळखू शकलो नाही. तेव्हा (हल्ल्याच्या वेळी) खोलीत खूप अंधार होता, तसेच सैफने दाढी ठेवली नव्हती, तो क्लीन शेव्हमध्ये होता. त्यामुले मी त्याला ओळखू शकलो नाही.
आरोपी फरार झाल्यानंतर घटना व तपासावर लक्ष ठेवून होता
चोरीच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शरीफुल इस्लामने त्याची वेशभूषा पूर्णपणे बदलली, केस कापले. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर हेडफोन खरेदी केली. आणखी ५० रुपयांचं साहित्य खरेदी केलं. “गाणी ऐकून मी माझं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो”, असं त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र, दादर स्टेशनबाहेर त्याने केलेली ही खरेदी पोलिसांना त्याच्यापर्यंत घेऊन गेली. कारण या काळात तो रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. त्यानंतर काहीच दिवसांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
शरीफुल इस्लाम सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फरार झाला होता. तो सातत्याने या प्रकरणाच्या बातम्यांवर, पोलीस तपासाविषयी समोर येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवून होता. त्याला माहिती होतं की त्याने केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी छत्तीसगडमधील दूर्ग येथून एका चुकीच्या व्यक्तीला पकडलं आहे.