मल्याळम अभिनेते मोहनलाल (Mohanlal) अभिनीत आणि पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘एम्पूरन’ (Empuraan) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सध्या धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चित्रपटामध्ये गुजरातमध्ये झालेली २००२ ची दंगल आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीचे काही संदर्भ दिले आहेत. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. याबवरून अनेक वाद-विवाद आणि प्रतिक्रिया समोर येत असताना आता मोहनलाल यांनी याबद्दल त्यांची बाजू मांडली आहे.
रविवारी केरळमध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या ‘एम्पूरन’ या चित्रपटात काही राजकीय आणि सामाजिक विषयांद्वारे प्रिय वाटत असलेल्या अनेकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मोहनलाल यांनी मनापासून खेद व्यक्त केला आहे. याबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी माफी मागितली आहे. तसेच दंगलीची दृश्यं काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे.
मोहनलाल यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे, “मला माहीत आहे की लुसिफर फ्रँचायजीचा दुसरा भाग असलेल्या ‘एम्पूरन’मध्ये दाखवलेल्या काही गोष्टी चाहत्यांना आवडल्या नाहीत. त्यामुळे खूप वाईट वाटलं. कारण- एक कलाकार म्हणून माझ्या चित्रपटाद्वारे कोणत्याही राजकीय चळवळी, विचारसरणी किंवा धर्माविरुद्ध द्वेष पसरणार नाही हे पाहणं माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एम्पूरन’च्या पूर्ण टीमसह मीदेखील चित्रपटातील दृश्यांमुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागतो.”

या पोस्टमध्ये मोहनलाल यांनी पुढे असं म्हटलं आहे, “आम्हाला समजते की, चित्रपटामागे काम करणाऱ्या लोकांची ही संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला आहे की, चित्रपटातून सर्व वादग्रस्त गोष्टी काढून टाकल्या जातील. चार दशकांपासून माझी या क्षेत्रातील कारकीर्द सुरू आहे. तुमचं प्रेम आणि विश्वास हीच माझी एकमेव ताकद आहे. त्यामुळे या सगळ्यापेक्षा मोहनलाल कुणीही नाही.”
दरम्यान, यापूर्वी चित्रपटाचे निर्माते गोकुलम गोपालन यांनी सांगितले होतं की, या चित्रपटातील एकूण १७ सीन काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुढे त्यांनी, “या बदलानंतर चित्रपट पुढील आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तसेच महिलांवरील हिंसाचार आणि दंगली दाखवणारी दृश्यंही या चित्रपटातून काढून टाकली जातील”, असंही सांगितलं.