L2 Empuraan Controversy : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘एम्पुरान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करीत असला तरी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘एम्पुरान’ चित्रपटातील काही सीन्समुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे ‘एम्पुरान’ चित्रपटातील १७ नव्हे, तर २४ गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात फक्त चित्रपटातील वादग्रस्त सीन्स नसून, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्याचं नाव हटवण्यात आलं आहे. त्याशिवाय खलनायकाचं नाव बदलण्यात आलं आहे.

२५ मार्चला ‘एम्पुरान’ चित्रपट चार भाषांत प्रदर्शित झाला आहे. पृथ्वीराज दिग्दर्शित या चित्रपटात मोहनलाल यांच्यासह पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. १ एप्रिलला ‘एम्पुरान’ चित्रपटाचे सहायक निर्माते एंटनी पेरुंबवूर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “सध्याची वादग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन, चित्रपटातील २४ गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाचे पुन्हा एडिटिंग केले जात आहे. एका भागाचं काम पूर्ण झालं असून, दुसऱ्या भागाचं काम सुरू आहे.”

‘एम्पुरान’ चित्रपटातील गर्भवती महिलांचे हिंसक सीन्स हटविण्यात आले आहेत. तसेच खलनायकाचं नाव बजरंगी काढून, बलदेव ठेवलं गेलं आहे. त्याशिवाय केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्या विनंतीनंतर आभार प्रदर्शनाच्या स्लाइडमधून त्यांचं नाव हटवलं गेलं आहे. चित्रपटात प्रमुख तपास संस्था एनआयएचा (NIA) चुकीचा उल्लेख केला गेला होता; पण आता नवीन आवृत्तीमध्ये तो भाग म्युट करण्यात आला आहे.

Photo Credit - Social Media
Photo Credit – Social Media

एंटनी पेरुंबवूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, चित्रपट पुन्हा एडिट करण्याचा निर्णय संपूर्ण टीमचा होता. आम्ही चुकीच्या विषयावर चित्रपट बनवत नाही. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे आणि कोणत्याही वादाची गरज नव्हती. चित्रपटाचं पुन्हा एडिटिंग कोणत्याही बाह्य दबावामुळे केलं गेलं नाही, तर काही प्रेक्षकांचा विचार करून केलं गेलं आहे. जेव्हा आम्हाला वाटलं की, समाजातील काही वर्ग नाराज आहे. तेव्हा आम्ही पुन्हा विचार करून निर्णय घेतला. अखेर आम्ही सगळे अंतिम निर्णयावर पोहोचलो आहोत. सुपरस्टार मोहनलाल यांना या निर्णयाची माहिती आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०२५ रोजी केरळ उच्च न्यायालयात ‘एम्पुरान’ या मल्याळम चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी करणारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने चित्रपटात गोध्रानंतरच्या जातीय दंगलींच्या चित्रणावर आक्षेप घेतला आणि म्हटले की, त्यामुळे जातीय हिंसाचार होऊ शकतो.