‘सत्यमेव जयते’ हा पूर्णत: वेगळा, संशोधनावर आधारित वैचारिक शो असल्याने त्यातून मांडले गेलेले विचार, उपस्थित केले गेलेले सामाजिक मुद्दे देशभर पोहोचायला हवेत, हा आमिर खानचा आग्रह आहे. विशेषत: पहिल्या पर्वात या शोला समाजातील सगळ्याच स्तरातून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर दुसऱ्या पर्वासाठीही आमिर आणि स्टार समूहाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून दक्षिण भारतात हा शो प्रभावीपणे पोहोचण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची मदत घेण्यात येणार आहे.
 ‘सत्यमेव जयते’चे दुसरे पर्व २ मार्चपासून स्टार प्लसवर सकाळी ११ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
‘सत्यमेव जयते’ हा शो स्टार समूहाच्या स्टार प्रवाह, स्टार विजय, स्टार उत्सव या वाहिन्यांबरोबरच दूरदर्शनवरही प्रसारित केला जाणार आहे. या शोला जे सामाजिक आणि वैचारिक महत्व प्राप्त झाले आहे ते लक्षात घेता देशभरातील लोकांपर्यंत हा शो पोहोचणे महत्वाचे झाले आहे. दक्षिण भारतातही शोसाठी एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र, त्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ नेहमीची प्रसिद्धी उपयोगी ठरणार नाही म्हणून निर्मात्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मोहनलाल यांनाही ‘सत्यमेव जयते’ची संकल्पना पसंत पडली असून त्यांनी दक्षिणेत या कार्यक्रमाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी होकार दिला आहे.दक्षिणेकडे या शोचा प्रचार करण्यासाठी मोहनलाल खास प्रोमोजमधूनही प्रेक्षकांना विविध विषयांबद्दलची माहिती देणार आहेत.

Story img Loader