‘इंडियन आयडल १२’ चा फिनाले जसजसा जवळ येतोय, तस तसं प्रेक्षक या शोमध्ये कोण विजेता ठरणार यावर अंदाज व्यक्त करताना दिसून येत आहेत. टीव्ही सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ मधल्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये मोहम्मद दानिश याचं देखील नाव आहे. आपल्या दमदार आवाजाने त्याने लाखो चाहत्यांचे मन जिंकलंय. दानिश या शो चा विजेता व्हावा आणि ‘इंडियन आयडल १२’ची ट्रॉफी आपल्या नावावर करावी, अशी लाखो चाहत्यांची इच्छा आहे. पण मोहम्मद दानिशने ‘इंडियन आयडल १२’च्या फिनालेपूर्वीच स्वतःला विजेता घोषित केलंय.

एका माध्यमाशी बोलताना मोहम्मद दानिशने या शो बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मोहम्मद दानिश म्हणाला, “इंडियन आयडल शो संपण्यापूर्वीच हिमेश रेशमिया यांनी मला गाण्याची संधी दिली. ते या शोमध्ये परिक्षण सुद्धा करत आहेत. हिमेश सर यांच्यासोबत काम करण्याचं मी स्वप्न पाहिलं होतं आणि आता ते प्रत्यक्षात साकार झालंय. अखेर मला हिमेश रेशमिया सर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.”

मोहम्मद दानिश याने जी स्वप्न पाहिलीत, ती या शोमधून प्रत्यक्षात साकारली आहेत. इंडियन आयडलच्या स्टेजने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलंय. त्याला गाण्याची नवी मिळाली. त्यामूळे तो आधीच या शो चा विजेता ठरलाय, असं दानिशने म्हटलंय. यावेळी दानिशने लंडनमध्ये होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टबद्दल देखील सांगितलं. लंडनमधलं हे म्युझिक कॉन्सर्ट त्याने पाहिलेल्या स्वप्नासारखंच असल्याचं त्याने सांगितलं.

यापुढे बोलताना दानिश म्हणाला, “लंडन कॉन्सर्ट सध्या तरी पुढे ढकलण्यात आलंय. पण ते कॉन्सर्ट होणार आहे, ते सुद्धा अरिजीत सिंह आणि ए आर रेहमान यांच्यासोबत…हे दोघेही या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार आहेत. माझ्यासाठी हे खूप मोठं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात साकारतंय. मी प्रेक्षकांचं मन जिंकलंय, फॅन्स बनवलेत. मला असं वाटतंय, मी माझ्या स्वतःसाठीच एक विजेता ठरलोय. प्रेक्षकांचं मला इतकं प्रेम मिळालंय. मग विजेता बनण्यासाठी मला आणखी काय हवंय?”

मोहम्मद दानिश याच्या व्यतिरिक्त टॉप सहा स्पर्धकांच्या यादीत पवनदीप राजन, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबले यांची देखील नावं आहेत. येत्या १५ ऑगस्टच्या दिवशी या शोचा ग्रॅण्ड फिनाले होणार आहे. हा ग्रॅण्ड फिनाले जवळपास १२ तासांचा असणार आहे. टीव्हीवर एखादा रिअ‍ॅलिटी शो इतक्या उशिरापर्यंत सुरू असणारा हा पहिला शो असणार आहे.