चित्रपटसृष्टीत बॉण्ड गर्ल म्हणून ओळख मिळवणारी अभिनेत्री मॉली पीटर्सचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयझटक्याने निधन झाले. इंग्लंडमधील वॉल्शम-एल-विलोज् येथे जन्म झालेल्या मॉलीने १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. टेरेंस यंग दिग्दर्शित ‘थंडरबॉल’ या बॉण्डपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटात पॅट्रिशिया फेयरिंग ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मॉलीने काही न्यूड सीन्स केले. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. जेम्स बॉण्ड चित्रपटात न्यूड सीन करणारी इतिहासातील ती पहिली अभिनेत्री होती. अनेक अ‍ॅडल्ट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एक्स प्रमाणपत्र दिले होते; परंतु मॉलीने या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले. पुढे अभिनय क्षेत्रात ती फार काळ टिकू शकली नाही. डास एक्स्पेरिमेंट्स (१९६६), टारगेट फॉर किलिंग (१९६६), डोंट राइस द ब्रीज, लोअर द रिव्हर (१९६८) हे काही मोजके चित्रपट वगळता अभिनय करण्याची फारशी संधी तिला मिळाली नाही. तिनेही काम मिळवण्यासाठी फारशी धडपड न करता मॉडेलिंग क्षेत्र निवडले आणि पाहता पाहता बॉण्ड गर्ल म्हणून ओळख मिळवणारी मॉली पीटर्स प्ले बॉय नियतकालिकांच्या कव्हर पेजवर झळकू लागली. पुढे अल्पावधीत तिने विवाह केला आणि इस्पविच येथे वास्तव्य करू लागली.गेल्या महिन्यात कॅसिनो रॉयल फेम दालिआ लवी आणि त्यानंतर रॉजर मूर यांचे झालेले निधन यामुळे जेम्स बॉण्डपट चाहते दु:खी होते. या पाश्र्वभूमीवर मॉली पीटर्सचे निधन चाहत्यांना अधिक वेदनादायी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा