प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिंरजीव अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुजरातमधील जामनगरपासून ते क्रूझ पार्टी आणि आता मुंबईत वेळोवेळी डोळे दीपवणारे सोहळे अंबानी कुटुंबियांनी आयोजित केलेले आहेत. आता १२ जुलै रोजी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे लग्न पार पडणार आहे. लग्नाच्या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांनी वांद्रे येथील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे चित्रपट लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक वरुण ग्रोव्हर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांच्या पोस्टला रिप्लाय करत “राजेशाही अराजकता निर्माण करते”, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.
वरुण ग्रोव्हर यांनी काय म्हटले?
मुंबई पोलिसांनी ५ जुलै आणि १२ ते १५ जुलै दरम्यान मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक बदलाबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. हे प्रसिद्धी पत्रक मुंबई पोलिसांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आल्यानंतर ग्रोव्हर यांनी त्यावर रिप्लाय करत टीका केली आहे. वर दिलेल्या तारखांना बीकेसीमध्ये सार्वजनिक कार्यक्रम असल्यामुळे वाहतुकीत बदल होत असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
५ जुलै रोजी बीकेसीमध्ये अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा विवाहपूर्व संगीत कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर १२ ते १५ जुलैपर्यंत तीन दिवस लग्न सोहळ्याचा कार्यक्रम चालणार आहे. वरून ग्रोव्हर यांनी एका ओळीत प्रतिक्रिया देताना म्हटले की, राजेशाहीतून अराजकता निर्माण होते. तसेच सार्वजनिक कार्यक्रम असा हॅशटॅग देऊन त्याच्या समोर एलओएल असे म्हणजे आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाला सार्वजनिक सोहळा म्हटल्याबाबत यावर त्यांनी ही उपहासात्मक प्रतिक्रिया दिली.
या वर्षीच्या सुरुवातीला गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाआधीचा एक सोहळा संपन्न झाला होता. यावेळी जामनगरच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तात्पुरता दर्जा देण्यात आला होता. या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायक रिहाना, बिल क्लिटंन, मार्क झकरबर्ग यांनी हजेरी लावली होती. तसेच बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर सोहळ्यासाठी उपस्थित होते.
५ जुलै रोजी पार पडलेल्या संगीत सोहळ्यालाही अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. जस्टीन बीबर सारख्या अतिशय महागड्या गायकाला या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. संगीत सोहळ्यात गाणे सादर करण्याच्या बदल्यात त्याला ८३ कोटींचे मानधन दिल्याचे बोलले जाते.