पैसा आणि प्रसिध्दीपेक्षा प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही आपल्यासाठी लाख मोलाची असल्याचे बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे मानणे आहे. ‘स्टुडन्ट ऑफ दी इयर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या वरुणने शाहरूख खानचा अभिनय असलेल्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘मै तेरा हिरो’ या आगामी चित्रपटात तो दिसणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील डेव्हीड धवन यांनी केले आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. पैसा आणि प्रसिध्दीला मी प्राथमिकता देत नाही. मला अभिनय करायला आवडतो. वडिलांना पैसा आणि प्रसिध्दी मिळतांना मी पाहिले आहे… त्यांच्यासाठी सुध्दा प्रेक्षक जास्त महत्वाचे आहे. माझ्यासाठी देखील प्रेक्षकांनी दिलेली दाद महत्वाची असल्याचे म्हणत वरुणने आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉलिवूडमध्ये आपली कोणाशीही स्पर्धा नसल्याचे सांगत वरुण म्हणाला, चित्रपटसृष्टीत कोणासमोर स्वत:ला सिध्द करण्यासाठी मी या क्षेत्रात प्रवेश केलेला नाही. माझ्यासाठी प्रेक्षक महत्वाचे आसून, त्यांचे प्रेम आणि त्यांनी माझा स्विकार करणे माझ्यासाठी गरजेचे आहे. विविध चित्रपटांद्वारे मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. एका ठराविक बाजाचे चित्रपट करून प्रेक्षकांना कंटाळा आणणाऱ्या भूमिका मला साकारायच्या नाहीत.
‘मै तेरा हिरो’ या आगामी चित्रपटाशिवाय वरुणकडे ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘एनी बडी कॅन डान्स’ चा सिक्वल आणि श्रीराम राघवनचा भयपट असे काही चित्रपट आहेत.