तब्बल २०० कोटी रुपयांच्या फसवणूकीच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरबाबत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिससारख्या अभिनेत्रींची नाव जोडली गेली आहेत. सुकेशनं या दोन्ही अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. याशिवाय जॅकलीन आणि सुकेश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही करण्यात आला होता. पण आता याबाबत सुकेश चंद्रशेखरनं तुरुंगातून पत्र लिहत मोठा खुलासा केला आहे. यामुळे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी सुकेश चंद्रशेखरनं लिहिलेलं पत्र प्रसारमाध्यमांसमोर प्रसिद्ध केलं आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार या पत्रात सुकेशनं त्याला ठग म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानं लिहिलं, ‘मी ठग नाहीये, माझ्याकडून पैसे घेणाऱ्या तुरुंगातील अधिकाऱ्यांचा तपास का केला जात नाही. माझ्याबाबत बरंच काही बोललं गेलं आहे, लिहिलं गेलं आहे. पण मी फसवणूक केली किंवा ठग आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण अद्याप माझ्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत.’
आपल्या या पत्रात सुकेशनं अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘मी जॅकलीनसोबत रिलेशनशिपमध्ये होतो’ असा दावा सुकेशनं या पत्रातून केला आहे. त्यानं लिहिलं आहे, ‘मी जॅकलीनसोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि म्हणूनच मी तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या दरम्यान आमच्या दोघांमध्ये झालेली कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण ही माझ्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधीत आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा जॅकलीनशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
दरम्यान सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींची फसवणूकीच्या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसचं नाव समोर आल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ईडीनं जॅकलीनची चौकशीदेखील केली आहे. याशिवाय आरोपी सुकेशनं जॅकलीनला दिलेल्या सर्व महागड्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच जॅकलीनला देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.