विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या शोमध्ये तुलना करून त्यात वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या शोमध्ये काम करतो ते अधिक चांगले कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करतो आणि रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळतो, असे मत अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले.
स्टार प्लसवर सुरू असलेल्या ‘मॅड इन इंडिया’ या शोच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव नागपुरात आला असता तो पत्रकारांशी बोलत होता. विविध वाहिन्यांवर वेगवेगळ्या पद्धतीची विनोदी मालिका आणि शो सुरू आहेत. कपिलचा शो, कॉमेडी सर्कस असो की ‘फू बाई फू’ ही मालिका असो, अशा शोमध्ये सहभागी होताना त्यांच्यामध्ये तुलना करण्यापेक्षा मी काय चांगले देऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करीत असतो. माझ्याकडून रसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. मॅड इन इंडिया या शोमध्ये एकमेव मराठी कलावंत असून कुठे कमी पडू नये यासाठी प्रयत्न करीत आहे.
सामान्य माणसांचे प्रश्न या शोमध्ये आहेत. मराठीपेक्षा हिंदी मालिकांमध्ये किंवा शोमध्ये काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अनेक चांगल्या कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळत असताना आपणही त्यांच्या तुलनेत कुठे कमी पडू नये यासाठी प्रयत्न करीत असतो. चित्रपटाचे काम खूप असल्यामुळे मालिकांमध्ये कामे कमी केली आहेत.
सिद्धार्थ जाधव म्हणून लोकांना खूप अपेक्षा आहे. ज्यावेळी या क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी अनेक उणिवांमुळे मी कुठे तरी कमी पडतो होतो. मात्र, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मेहनत घेतली आणि चित्रपट क्षेत्रात बऱ्यापैकी यश मिळवू शकलो. सुनील पाल, खयाली या सारखे कलावंत या शोमध्ये असून त्यांच्यासोबत काम करताना वेगळा आनंद मिळतो. मराठी कलावंतांना हिंदी चित्रपटात चांगल्या भूमिका मिळतात. पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिली नाही. मराठी रसिकांचा हिंदी चित्रपटांकडे कल असल्यामुळे निर्मात्यांकडूनही मराठी कलावंतांची मागणी वाढत आहे, असेही जाधव म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा