विनोद सम्राट कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या दूरचित्रवाणी वरील विनोदी कार्यक्रमाच्या सेटला काल(बुधवार) आग लागून तो भस्मसात झला असतानाच, त्याच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली आहे. कपिलविरूध्द आयकर विभागाने ६० लाखापर्यंतचा कर न भरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.
“कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमांच्या उत्पन्नानुसार आयकर भरला नसल्यामुळे आम्ही कपिलच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे,” असे आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे कपिलच्या आयकराची थकित रक्कम ६० लाख आहे. बुधवारी त्यासंदर्भात कपिल शर्माला आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी प्रश्न विचारले असून, चौकशीसाठी त्याला पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे अधइकाऱ्यांनी सांगितले.
“जर कपिलने वेळेमध्ये कर भरला नाही तर त्याच्या विरोधात पुढील कारवाई करण्यात येईल,” असे आयकर विभागाचे अधिकारी म्हणाले.
काल गोरेगाव चित्रपट नगरीतूल कपिलच्या सेटला भयानक आग लागली होती. त्या आगीमध्ये कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या दूरचित्रवाणी वरील विनोदी कार्यक्रमाचा सेट जळून खाक झाला. मात्र, त्या अपघातामध्ये कोणतीही जीवित हाणी झाली नाही.
कपिल यजमान असलेल्या कलर वाहिणीवरील ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या कार्यक्रमाचा अनेक चित्रपट तारे-तारका त्यांच्या चित्रपटांच्या पूर्वप्रदर्शन प्रसिध्दीसाठी उपयोग करून घेत आले आहेत.