सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहासावर आधारित बरेच चित्रपट येत आहेत. एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था सध्या बिकट दिसत असली तरी अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटापासून बॉलिवूडचा ऐतिहासिक चित्रपटांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला असल्याचं दिसत आहे. नुकतंच ‘महाभारत’ यावर बेतलेल्या सीरिजची झलक आपल्याला बघायला मिळाली होती. आता एका मीडिया रीपोर्टनुसार महाभारतावर सर्वात महागडा चित्रपटसुद्धा तयार होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
आजपर्यंत महाभारतावर आधारित एकमेव चित्रपट आलेला आहे ज्यात पद्मिनी कोल्हापुरे, प्रदीप कुमार, दारा सिंगसारखे कलाकार बघायला मिळाले होते. त्या चित्रपटाची निर्मिती केली होती ए.के नाडियाडवाला यांनी. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार त्यांचाच मुलगा म्हणजे फिरोज नाडियाडवाला हे पुन्हा महाभारत मोठ्या पडद्यावर साकारणार असल्याचं म्हंटलं जात आहे.
एवढंच नाही तर हा चित्रपट भारतात बनलेल्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असेल असंही म्हंटलं जात आहे. चित्रपटाच्या कथेवर गेली ५ वर्षं काम सुरू आहे. २०२५ पर्यंत हा चित्रपट पूर्ण होऊन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट अमेरिकेच्या डिसी आणि मारवेलच्या सुपेरहिरोपेक्षा खूप मोठा असणार आहे असा आत्मविश्वास नाडियाडवाला यांना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचं बजेट ७०० कोटी असेल असं म्हंटलं जात आहे. शिवाय हा चित्रपट 5D मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येईल असंही म्हंटलं जात आहे.
याबरोबरच या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर हे काही दिग्गज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे यापैकी कोणती भूमिका कोण साकारणार असल्याची उत्सुकता लागली आहे. शिवाय चित्रपटातल्या अभिनेत्रींबद्दल अजूनतरी काहीच खुलासा झालेला नाही. महाभारतासारखी गोष्ट ही मानवी इतिहासातली एक अजरामर गोष्ट आहे आणि त्यामुळे या चित्रपटाचे मेकर्स यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महाभारतावर सीरिज लवकरच प्रदर्शित होणार असून. रामायणावरही लवकरच एक चित्रपट आपल्याला बघायला मिळू शकतो. तसंच अभिनेत्री कंगना रणौतदेखील ‘सीता’ या चित्रपटावर काम करत आहे. हे लक्षात घेता येत्या काळात बॉलिवूडकडून आपल्याला बरेच ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षक त्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.