२०२१ या वर्षी केवळ एकाच चित्रपटाने सारं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं, तो चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर लोकांनी या चित्रपटासाठी तोबा गर्दी केली. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली, त्यावर कित्येक रील आणि मीम्स व्हायरल झाले. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहादचा अभिनय सगळंच लोकांना प्रचंड आवडलं आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागासाठी आस लावून बसले आहेत.
नुकताच या चित्रपटाचा शुभारंभ झाला होता आणि ते पाहून प्रेक्षकही चांगलेच उत्सुक झाले होते. आता त्यांच्या उत्सुकतेत आणखीन भर पडणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ‘पुष्पा द रूल’ या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून लवकरच पुष्पाचा नवीन लूक लोकांना बघायला मिळू शकतो.
आणखी वाचा : सैफ अली खानने मांडलं चित्रपट समीक्षणावर स्वतःचं मत, म्हणाला “रिव्ह्यू वाचून मला…”
नुकताच अल्लू अर्जुनला साऊथ इंडियन इंटरनॅशनल चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘पुष्पा’साठी पुरस्कार दिला गेला. या कार्यक्रमात अल्लूने त्याच्या ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या काही स्टेप्स करून दाखवल्या. पुष्पाच्या या पुढील भागात कथा नेमकं काय वळण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
अल्लू अर्जुनच्या काही चाहत्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. पण ते अधिकृत फोटो नसल्याचं स्पष्ट झालं असून अल्लू अर्जुनचा लूक अजून कुठेच दाखवला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचा चित्रीकरण सुरू होऊन हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानानेही काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल खुलासा केला होता.