प्रेक्षक आतुरतेने ज्या चित्रपटाची वाट पाहत होते तो लोकप्रिय सुपरस्टार व अभिनेत्याचा बहुचर्चित ‘पीके’ म्हणजे खरेतर राजकुमार हिरानी-आमिर खान या जोडगोळीचा दुसरा चित्रपट आहे. मुख्य प्रवाहातील बॉलीवूड चित्रपटांच्या ‘ट्रेण्ड’ला धक्का देण्याबरोबरच अशा चित्रपटांची गरज अधोरेखित करणारा ‘पीके’ निखळ विनोदी, रोमॅण्टिक आणि हा मसाला असूनही आतापर्यंतच्या रोमॅण्टिक, विनोदी चित्रपटांपेक्षा पूर्णपणे निराळा, आपल्याला माहीत असलेल्याच गोष्टी अधिक प्रकर्षांने विनोदाच्या माध्यमातून सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या दिग्दर्शकाचा एक सजग प्रयत्न निश्चितच आहे. पीकेचे पडद्यावरील रूप, पीके विचारतो ते निरुत्तर करणारे प्रश्न यामुळे मध्यांतरापर्यंत प्रेक्षकाला एकामागून एक आश्चर्याचे धक्के पीके देतो, धमाल करमणूकही करतो. फक्त क्लायमॅक्स सोडला तर अखंड चित्रपट धमाल हसवणूक करतानाच पीके प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात पूर्ण यशस्वी ठरला आहे.
पीके म्हणजे आमिर खानची एक मौल्यवान चीजवस्तू हरवली आहे, कुणीतरी चोरली आहे आणि ती मिळाल्यानंतरच त्याला आपल्या घरी परतता येणार आहे. त्यामुळे ही चोरीला गेलेली वस्तू शोधण्यासाठी तो सुरुवातीला राजस्थानात जातो. तिथे त्याला भैरोसिंह हा मित्र भेटतो, तो त्याला मदत करतो. दिल्लीत ती चोरीला गेलेली वस्तू सापडेल म्हणून पीके दिल्लीला येतो. या राजधानीच्या भल्यामोठय़ा महानगरात पहिल्यांदा त्याला पोलीस भेटतो. पोलिसाला पीके आपली तक्रार सांगतो, चोर शोधून काढा, वस्तू परत हवी असे पीके सांगतो. पण पोलीस निघून जातो. मग त्याला भगवंत हाच तुला तुझी चीजवस्तू शोधून देईल, असे अनेक लोक सांगतात. म्हणून पीके अनेक देवदेवतांची मंदिरे, मशीद-चर्चपासून ते गुरूद्वारापर्यंत अनेक ठिकाणी देवाला जाऊन साकडे घालतो. त्याची हरवलेली चीजवस्तू मिळवून देण्यासाठी जग्गू म्हणजे अनुष्का शर्मा त्याला दिल्लीत मदत करते. ‘पीके’ हे नाव असले तरी आमिर खान अखंड सिनेमात कुठेच काहीच पित नाही. पीकेची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मा आहे का तर तसे मात्र नाही. पीके राजस्थानात पोचतो तेव्हा अनुष्का म्हणजे जग्गू ही बेल्जियममध्ये असते. तिची सरफराजशी गाठ पडते अर्थात इकडे पीके राजस्थानात जातो त्याचवेळी अनुष्का-सरफराज यांची भेट होते असे योगायोग दाखविण्यात आले असून या दोन घटनांच्या अन्योन्य संबंध याची चित्रपटात उत्तम गुंफण दिग्दर्शकाने केली आहे. बेल्जियममध्येच जग्गू आणि सरफराज यांची प्रेमकथा अर्धवट ठेवून जग्गू आपल्या घरी दिल्लीला परतते. मग ती एका न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून नोकरी करू लागते. मग सतत ‘स्टोरी’च्या शोधात फिरताना पीके तिला अचानक भेटतो, पहिल्यांदा त्याचा अवतार पाहून आणि विशेषत: त्याचे ताणलेले कान पाहून जग्गूला कुतूहल वाटते, त्यापेक्षाही अधिक तिला आश्चर्य वाटते. मग दोघांची अधूनमधून अकस्मात भेट होत राहते आणि तिच्याबरोबरच प्रेक्षकालाही पीके आश्चर्याचे धक्के देत भेटत राहतो.
एखादा माणूस आपण लोकलमधून जात असताना पाहतो, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचा पेहराव, त्याची स्टाइल पाहून आपण मनातल्या मनात त्याच्याबद्दल काही अंदाज बांधतो तसाच हा सिनेमा आहे. प्रेक्षकांना माहीत असलेले सत्य सांगून प्रेक्षकांचे कान टोचण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने कधी संवादांच्या माध्यमातून, विनोदाच्या माध्यमातून उत्तम रीतीने केला आहे. पीके भोजपुरीत बोलतो. जी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी दिग्दर्शकाने मुख्य व्यक्तिरेखेच्या भोजपुरी भाषेचा आधार घेऊन अफलातून धमाल आणली आहे.
मध्यांतरापर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात मध्यांतरानंतर थोडा संथपणा येतो. शेवटच्या प्रसंगातील रोमॅण्टिक स्टोरीचा अतिरंजितपणा सोडला तर अखंड चित्रपटात पीकेच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून, संवादांतून चित्रपट उत्तम रीतीने उलगडत जातो.
संजय दत्त हा हिरानी यांचा आवडता कलावंत असला तरी या चित्रपटातील भैरोसिंह या भूमिकेसाठी संजय दत्त व्यतिरिक्त कोणताही नट चालला असता. दिग्दर्शकाला जे मांडायचे आहे, प्रेक्षकांपर्यंत ठोसपणे पोहोचवायचे आहे ते पीके या मुख्य भूमिकेद्वारे आमिर खानने संयतपणे पोहोचविले आहे. बावळट, मूर्ख येरागबाळा न वाटता, निरागसता राखून, अतिशय निष्पापपणे पीके लोकांना प्रश्न विचारतो ज्यामुळे चित्रपटातील अन्य व्यक्तिरेखा निरुत्तर होतात आणि प्रेक्षकही निरुत्तर होतो. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सवरेत्कृष्ट अभिनय केला असून त्याला अनुष्का शर्माचीही उत्तम अभिनयाची जोड मिळाली आहे. सौरभ शुक्लानेही तपस्वी ही भूमिका अजरामर केली आहे. वेशभूषा हा या चित्रपटातील महत्त्वाचा विभाग ठरला असून वेशभूषाकारालाही गुण द्यावे लागतील. लेखक-दिग्दर्शकांनी त्यांना जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते फक्त त्यांनी कोणताही आव न आणता पीके या निरागस व्यक्तिरेखेतून मांडले आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचे काम खुबीने प्रेक्षकांवर सोपविले आहे. त्यामुळे चित्रपट कुठेही प्रचारकी थाटाचा न बनता अगदी साधेपणा ठेवून पटकथेची मांडणी केली आहे आणि ही मात्रा चांगलीच लागू पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीके
निर्माता – राजकुमार हिरानी विधु विनोद चोप्रा, सिद्धार्थ  रॉय कपूर
दिग्दर्शक-संकलक- राजकुमार हिरानी
लेखक – अभिजात जोश्ांी, राजकुमार हिरानी,
श्रीरंग नाम्बियार
संगीत – अजय-अतुल, शंतनु मोईत्रा, अंकित तिवारी
गीते – स्वानंद किरकिरे
छायालेखन –  सी. के. मुरलीधरन
कलावंत – आमिर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणी, सौरभ शुक्ला, राम सेठी, परिक्षित सहानी, अमरदीप झा, रीमा देबनाथ, धीरेंद्र द्विवेदी, साई गुंडेवार

पीके
निर्माता – राजकुमार हिरानी विधु विनोद चोप्रा, सिद्धार्थ  रॉय कपूर
दिग्दर्शक-संकलक- राजकुमार हिरानी
लेखक – अभिजात जोश्ांी, राजकुमार हिरानी,
श्रीरंग नाम्बियार
संगीत – अजय-अतुल, शंतनु मोईत्रा, अंकित तिवारी
गीते – स्वानंद किरकिरे
छायालेखन –  सी. के. मुरलीधरन
कलावंत – आमिर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणी, सौरभ शुक्ला, राम सेठी, परिक्षित सहानी, अमरदीप झा, रीमा देबनाथ, धीरेंद्र द्विवेदी, साई गुंडेवार