२०२२ हे वर्षं संपायला आलंय आणि सोशल मीडियावर यावर्षी सर्वात जास्त चर्चेत असलेल्या चित्रपट आणि वेबसीरिजची चर्चा होऊ लागली आहे. नुकतंच गुगलनेही याचा खुलासा केला आहे. २०२२ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटाबद्दल गुगलने खुलासा केला आहे. गुगलने दिलेला रीपोर्ट बघून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आहे. कारण गुगलने दिलेल्या या माहितीनुसार यामध्ये दाक्षिणात्य नव्हे तर बॉलिवूड चित्रपटाचा समावेश आहे.
गुगलच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ हा चित्रपट गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला आहे. बॉयकॉट ट्रेंड जोरात असतानासुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि बॉलिवूडमधील मरगळ दूर सारली. ‘ब्रह्मास्त्र’ने याबाबतीत मोठमोठ्या दाक्षिणात्य चित्रपटांना मात दिल्याने बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
आणखी वाचा : “हा अधिकार…” लग्नात बायकोकडून कुंकू लावून घेणाऱ्या राजकुमार रावचं वक्तव्य चर्चेत
‘आरआरआर’, ‘केजीएफ चॅप्टर २’सारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘ब्रह्मास्त्र’ने ही बाजी मारली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ पहिल्या नंबरवर तर ‘केजीएफ २’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘कांतारा’ हा पाचव्या क्रमांकावर आहे.
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४०० कोटीची कमाई केली होती. बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसूनसुद्धा या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. याचे आणखी २ भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक त्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.