भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने २६ मार्च रोजी आत्महत्या केली. २५ वर्षीय आकांक्षाने गळफास घेत जीवन संपवलं. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आकांक्षाचा मृतदेह सापडला. तिच्या आत्महत्येने भोजपुरी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. आत्महत्येनंतर आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. आकांक्षाच्या शवविच्छेदनाचा अहवालात तिने गळफास घेतल्यानेच मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.
आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड समर सिंहवर गंभीर आरोप केले होते. आकांक्षाच्या आईने समरवर अभिनेत्रीची हत्या केल्याचा आरोप केला होता. आकांक्षाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या समर सिंहला कठोर शिक्षा देण्याची मागणी तिच्या आईने केली. ‘आज तक’शी बोलताना आकांक्षाची आईने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली. आता पुन्हा आकांक्षाच्या आईने यावर भाष्य केलं आहे.
पोलिस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचं आकांक्षाच्या आईचं म्हणणं आहे. त्याबद्दल तिची आई म्हणाली, “पोलिसांकडून सतत वेळ मागितला जात आहे आणि मी त्यांना तो वेळ देतही आहे, पण या प्रकरणात कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. पोलिसांवर विश्वास का ठेवावा? मी जेवढ्या लोकांची नावं दिली त्यापैकी एकाच्या विरोधातही कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच माझ्या मुलीला न्याय मिळवून देतील, आणि जर ते न्याय मिळवून देऊ शकत नसतील तर मीसुद्धा आत्महत्या करेन.”
वाराणसी पोलिस कमिशनर कार्यालयात आकांक्षाच्या आईने ही धमकीवजा विनंती केली आहे. आकांक्षाचे भोजपुरी गायक व अभिनेता समर सिंहबरोबर प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहत असल्याची चर्चा आहे. व्हॅलेंटाइन डेला आकांक्षाने समर सिंहबरोबर फोटो शेअर करत प्रेमाची कबुलीही दिली होती.