आई या शब्दात एक वेगळीच जादू आहे. संकटात मुलांच्या डोक्यावर मायेचं छत्र धरते, आपलं मूल कुठे चुकलं तर त्याला सुधारण्याची संधी देते ती आई. त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक अनन्यसाधारण स्थान असतं. दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्यानुसार आईला शुभेच्छा देतात. कोणी आईला घरकामात मदत करतं, तर कोणी तिच्यासाठी छान गिफ्ट आणतं. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींसाठीही त्यांची आई खास असते. त्यामुळे तेदेखील हा दिवस उत्साहात साजरा करतात. विशेष म्हणजे यंदा अभिनेता आयुषमान खुरानाने या दिवसाचं निमित्त साधत आपल्या भारतमातेसाठी आणि समस्त आईवर्गासाठी एक खास गाणं तयार केलं आहे.

‘द हिंदू’नुसार,आयुषमानने मदर्स डेसाठी ‘माँ’ हे खास गाणं तयार केलं असून मदर्स डेच्या दिवशी (१० मे) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी त्याने या गाण्याची एक झलक सादर केली आहे. “एक आई आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार असते. त्यांच्यावर ती निस्वार्थ प्रेम करते, त्यांच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते. त्यामुळे खरं तर प्रत्येक दिवशी मदर्स डे साजरा केला पाहिजे. मात्र ठीक आहे हा एक दिवसदेखील तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे निदान या दिवशी तरी आपण तिच्यासाठी काही तरी करावं”, असं आयुषमान म्हणाला.


पुढे तो म्हणतो, “यंदाच्या मदर्स डेला मी सगळ्या मातांना, आईंना उद्देशून ‘माँ’ हे गाणं तयार केलं आहे. आईचं जे प्रेम, जी ममता असते ते पाहून मी कायम थक्क होतो. त्यामुळे माझी बरीचशी गाणी आईला समर्पित केलेली असतात”. दरम्यान, आयुषमानने ‘मदर्स डे साठी ‘माँ’ हे नवीन गाणं तयार केलं असून संगीतकार रोचक कोहली याने त्याला संगीत दिलं असून या गाण्याचे बोल गुरप्रीत सैनीने लिहिले आहेत.

Story img Loader