‘वाळवी’च्या यशानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे असे एकापेक्षा एक कलाकार मंडळी एकत्र येणार म्हटल्यानंतर त्यांच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीच होती. आता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचं नवं कोरं मोशन पोस्टर प्रकाशित करत चित्रपटाचे निर्माते अभिनेता स्वप्निल जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील या मंडळींनी ‘नाच गं घुमा’चा विषय काय असेल याची कल्पना प्रेक्षकांना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चे नवीन मोशन पोस्टर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरवर ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते,’ ‘प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते,’ अशा आशयाची घोषवाक्ये देण्यात आली आहेत. ‘‘प्रत्येक गृहिणी तिच्या घराची ‘राणी’ त्याचवेळी बनू शकते जेव्हा तिची कामवाली तिच्यासाठी ‘परीराणी’ होते. या पोस्टरमधूनही हीच संकल्पना समोर येते आहे. मुक्ता बर्वे राणीच्या वेशात आहे तर तिची कामवाली बनलेली नम्रता परीराणीच्या वेशात. म्हणजे दोघींमध्ये राणी आणि परीराणीचे नाते आहे. त्यातून पुढे काय धमाल करमणूक होते, ती अनुभवण्यासाठी रसिकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार आहे,’’ असे स्वप्निल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४’, भारताची सिनी शेट्टी टॉप-४च्या शर्यतीतूनच झाली बाहेर

महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाववैशिष्टय़ांवर, गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे, अशी माहिती दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी दिली. या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना, ‘‘सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्निल यांना या कथेच्या वाचनासाठी बोलावले. हसून हसून हैराण झाले ते. आमची मैत्रीण तृप्ती पाटील हिनेही त्यात उडी मारली. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला’’, अशी माहिती मधुगंधा कुलकर्णी यांनी दिली. दिग्गज कलाकार, निर्माते यांचा सहभाग असलेला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motion poster of naach gam ghuma released amy
Show comments