जया किशोरी या एक प्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या आहेत. सोशल मीडियावर त्या नेहमी लोकांना प्रेरित करणारे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्हिडीओला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. लोकांनी आपले आयुष्य कसे जगावे यासाठी त्या मार्गदर्शन करत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का जया किशोरी या वक्त्याबरोबच एक उत्तम नृत्यांगनाही आहेत.
जया किशोरी यांनी नुकतेच एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या नृत्य आवडीबाबत खुलासा केला. त्या म्हणाल्या, “माझे पहिले प्रेम नृत्य आहे आणि मला अजूनही नृत्याची खूप आवड आहे. मला शालेय अभ्यासात फारसा रस नव्हता. माझ्या आईने खूप कष्ट करून मला वाढवले आणि शाळेत पाठवले. शनिवार आणि रविवारी माझे कथ्थक नृत्याचे वर्ग असायचे. नृत्याच्या वर्गाला जाण्याची मला एवढी ओढ असायची की मी पूर्ण रात्र जागून काढायची.”
जया किशोरी पुढे म्हणाल्या, संध्या रॉय यांच्या गाण्यावर मी दोनदा डान्स केला होता. ते डान्स माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय होते. त्या डान्समध्ये मला कुणीच हरवू शकले नाही. बालपणी जया किशोरी यांनी ‘बूगी वूगी’ या रिॲलिटी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्यांनी अतिशय धमाकेदार शास्त्रीय नृत्य केले होते.
जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ साली एका आध्यात्मिक कुटुंबात झाला. जया किशोरी यांचे कुटुंब मुळचे राजस्थानचे आहे. पण, सध्या त्यांचे संपूर्ण कुटुंब कोलकाता येथे राहते. जया किशोरी सात वर्षांच्या असताना त्यांचा अध्यात्मिक जगाकडे कल वाढला. जया किशोरी यांच्यावर आजोबांचा खूप प्रभाव होता. ते त्यांना श्रीकृष्णाच्या कथा सांगायचे. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्र, रामाष्टकम् यांसारखी संस्कृतमधील सर्व स्तोत्र तोंडपाठ केली होती. जया किशोरी यांचे गुरू गोविंद राम मिश्रा यांनी त्यांना ‘किशोरी जी’ ही पदवी दिली.
हेही वाचा- ‘शार्क टँक इंडिया’मधील ५०% डील्स या पूर्ण होतच नाहीत; खुद्द शार्क्सनीच व्यक्त केली खंत
जया किशोरी कथाकथन करण्यासाठी लाखो रुपयांची फी घेतात. एका रिपोर्टनुसार, त्या एका कथेसाठी १० लाख रुपये फी घेतात. जया किशोरी यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग असतो. फीमधील अर्धा हिस्सा त्या समाजकार्यासाठी दान करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्या उचलतात.