टेलिव्हिजन विश्वात नावारुपास आल्यानंतर बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अशा कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री मौनी रॉयचाही समावेश झाला आहे. मौनी आता मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे. मौनीने नुकतेच ‘नागिण २’ मालिकेचे चित्रीकरण संपवले. या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तिला सलमान खान त्याच्या चित्रपटातून लाँच करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र मौनी लवकरच अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या आगामी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय येत्या काळात ती, आयुष शर्मासोबतही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर मौनी छोटया पडद्याला विसरेल की काय अशी चर्चा सध्या पाहायला मिळतेय. छोट्या पडद्यावरूनच नावारुपास आल्यानंतर आपण टेलिव्हिजन विश्व सोडणार नसल्याचे मौनीने स्पष्ट केले.
‘नागिण २’ मालिकेतील मौनीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेमुळेच सोशल मीडियावरही तिच्या फॉलोअर्सचा आकडा वाढला. त्यामुळे त्यामुळे बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर तिला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार नाही असे अनेकांना वाटत होते. ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मौनी म्हणाली की, ‘टेलिव्हिजनमधूनच माझी प्रगती झाली. आज मी जेथे आहे ते सर्व छोट्या पडद्यामुळे आहे. त्यामुळे मी छोटा पडदा कधीही सोडणार नाही.’
वाचा : वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच गरोदर सेलिना दुबईहून भारतात परतली
https://www.instagram.com/p/BVRYJDyAdS0/
https://www.instagram.com/p/BUgVK8XARPV/
माझे आयुष्य मला छोट्या पडद्याने दिले आहे असे सांगताना ती पुढे म्हणाली की, ‘चित्रपटांमध्ये काम करायची आवड असल्याने मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. माझे अभिनय कौशल्य मला आणखी खुलवायचे आहे. चित्रपटांमधील माझ्या भूमिकांना मला जगायचे आहे. मात्र छोट्या पडद्याने मला सर्वस्व दिले आहे.’ मौनीच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. लवकरच ‘नागिण’ चा मालिकेचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये मौनी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.