ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल सिन्हा हिचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ती आजारी होती. अनेकवेळा तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर गुरूवारी मध्यरात्री वयाच्या ४५ व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.

पायलने २०१० साली व्यावसायिक डिकी सिन्हासह लग्न केले होते. मात्र काही वर्षानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. पतीसोबत सातत्याने होणाऱ्या भांडणांमुळे पायल निराश झाली होती. त्यानंतर एकदा ती कोमात देखील गेली होती. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर डिकी तिची काळजी घेत नसून तिच्यावर केले जाणारे सर्व उपचार बंद केले आहेत, असा आरोप मौसमी यांनी केला होता. तसेच पायलची देखभाल करण्यासाठी पालकांना संमती देण्यात यावी अशीही मागणी मौसमी यांनी न्यायालयाकडे केली होती. तुर्तास पायलच्या निधनाची बातमी कळताच निकटवर्तीयांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.