एक चित्रपट चांगला चालला की त्याच्या जीवावर पुढच्या चित्रपटांचा घाट घातला जातो. आधीच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्या साकारणारे कलाकार लोकप्रिय झालेले असतात, त्यामुळे तोच पाया ठेवून त्यावर नवनव्या चित्रपटांचा कळस रचण्याचा ट्रेण्ड बॉलीवूडमध्ये प्रचलित आहे. योगायोग म्हणजे या ऑगस्ट महिन्यात हिंदूी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेल्या आणि कमाईच्या बाबतीतही सरस ठरलेल्या दोन मोठय़ा चित्रपटांचा भाग दुसरा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, आणखीही काही गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल्स या वर्षभरात पाहायला मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची फाळणी झाली आणि कित्येक जीवलग दोन वेगेवगळय़ा देशांत विभागले गेले. अशाच पद्धतीने ताटातूट झालेल्या तारासिंग आणि सकीना या प्रेमी विवाहित जोडप्याची कथा अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर’ या चित्रपटात दाखवण्यात आली होती. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगली कमाई केली होती. याच चित्रपटाबरोबर आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान जोडीचा ‘लगान’ हा मोठा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तरीही ‘गदर’ या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचून घेतली. आज दोन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर अनिल शर्मा यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ‘गदर-२’ चित्रपटाचा घाट घातला आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या चित्रपटात फाळणीची पार्श्वभूमी होती, तर या सिक्वेलपटात १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. तारासिंग आणि सकीना यांची भूमिका साकारणारे अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर-२’मध्येही एकत्र झळकणार आहेत. अर्थात, याही चित्रपटाची सारी मदार तारासिंगवर म्हणजेच सनी देओलवर आहे. पण, यावेळी सकीनाला नव्हे तर सीमेवर लढणाऱ्या आपल्या मुलाला पाकिस्तानातून भारतात आणण्यासाठी संघर्ष करणारा तारासिंग पाहायला मिळणार आहे.

सिक्वेलपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं तुलनेने सोपं असतं. लोकांना त्यातले कलाकार आवडलेले असतात. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल’, साजिद नाडियादवालांची निर्मिती असलेली ‘हाऊसफुल्ल’ चित्रपट श्रृंखला गाजल्या असल्या. तरी अनेकदा सिक्वेलपट मूळ चित्रपटाएवढेच यशस्वी होतात असं नाही. त्यामुळे वीस वर्षांनंतर येणाऱ्या ‘गदर-२’लाही प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणखी एक महत्त्वाचा सिक्वेलपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तो म्हणजे अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड-२’. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर थेट देवालाच न्यायालयात उभं करणाऱ्या कांजीभाईची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. देव म्हणजे काय? श्रद्धा-अंधश्रद्धा यावर मार्मिक, रंजक पद्धतीने भाष्य करणारा हा चित्रपट उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला होता. परेश रावल आणि अक्षय कुमार या जोडगोळीच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सिक्वेल दशकभरानंतर पु्न्हा प्रेक्षकांसमोर येतो आहे. यावेळी सिक्वेलपटाचा लेखक – दिग्दर्शक वेगळा आहे. परेश रावलही नव्या चित्रपटात नाहीत. केवळ अक्षय कुमारच्या जोरावर या सिक्वेलपटाचा घाट घातला आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अशी जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘ओएमजी-२’ हा चित्रपटही मूळ चित्रपटाइतकाच विषयाची धारदार मांडणी करणारा आहे की नुसताच लोकप्रिय चित्रपटाचा पुढचा भाग हे येत्या काही दिवसांत प्रेक्षकांसमोर येईल.

वर्षभरात प्रदर्शित होणारे सिक्वेलपट..

या वर्षभरात आणखी काही नावाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेलपट प्रदर्शित होणार आहेत. सलमान खान-कतरिना कैफ जोडीचा ‘टायगर-३’ हा सिक्वेलपट या वर्षभरात प्रदर्शित होणार आहे. या सिक्वेलपटात शाहरुख खान पाहुण्या भूमिकेत असेल असं आधीच सांगितलं गेलं आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता आहे. या तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीमगर्ल’ या आयुषमान खुराणाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने अनपेक्षितपणे तिकीटबारीवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून यात आयुषमानबरोबर अभिनेत्री अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. फरहान अख्तर-रितेश सिधवानी जोडीची निर्मिती असलेल्या ‘फुकरे’ चित्रपटाचा तिसरा भाग यावर्षी प्रदर्शित होणार आहे. पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, अली फजल आणि रिचा चढ्ढा या पाच जणांनी चित्रपटाचे दोन्ही भाग गाजवले आहेत. तिसऱ्या भागात अली फजल वगळता बाकी सारे कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय, दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘सिंघम-३’ची तयारी सुरू केली आहे. तर ‘आशिकी-३’ची घोषणाही करण्यात आली असून यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie artist bollywood hindi movies amy
Show comments