अभिनेता सलमान खानचा बजरंगी भाईजान  हा चित्रपट जरी लोकांची सिनेमाघरात गर्दी खेचत असला तरी इर्शाद खान या तरुणाला मात्र या सिनेमाने तुरूंगात पोहोचवले आहे.गोरेगावला राहणाऱ्या अपूर्वा नंदी यांचा फूल विक्रीचा आणि फुले सजावटीचा व्यवसाय आहे. मोठय़ा कार्यक्रमासाठी, हॉटेलात ते फूले पुरवित असतात. त्यांच्याकडे इर्शाद खान (३२) हा तरुण गेल्या चार वर्षांपासून काम करत होता. १५जुलै रोजी रात्री नंदी गोरेगाव येथील आपल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मित्रासोबत घरात होते. त्या दिवशी त्यांना एका ऑर्डरचे ८ लाख रुपये मिळणार होते. रात्री साडेनऊ वाजता चार तरुण त्यांच्या घरात शिरले. घरात घुसताच त्यांनी नंदी आणि त्यांच्या मित्राचे तोंड चिकटपट्टीने बांधले आणि त्यांना घराच्याच बाथरूममध्ये कोंडून ठेवले. यानंतर आरोपींनी घरातील रोख रक्कम शोधाला सुरवात केली. पण त्यात त्यांना काही सापडले नाही. मग त्यांनी लॅपटॉप, सहा महागडे मोबाईल आणि एटीएम कार्ड लुटून नेले. नंदी यांनी एटीएम कार्डच्या मागेच आपला एटीएम कोड क्रमांक लिहून ठेवला होता. या चोरांनी मग काही वेळेतच त्या पिन क्रमांकाने एटीएम मध्ये जाऊन ४० हजार रुपये काढले.  इमारतीत सीसीटीव्ही नव्हते तसेच सुरक्षा रक्षकालाही काही माहिती नव्हती. ज्या अर्थी चोरांनी घरात प्रवेश केला आणि त्या अर्थी त्यांना नंदी यांच्या कार्यपद्धतीची माहिती असावी असा तर्क या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांनी लावला. पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने आणि बांगूर नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना सांगून पुढची रणनिती तयार केली. त्यांनी नंदी यांच्याकडे काम करणाऱ्या इर्शादला ताब्यात घेतले. नंदी यांनी त्याला आक्षेप घेतला होता. तो त्यांच्या गावातला होता आणि विश्वासू होता. पण पोलिसांनी त्याकडे लक्ष न देता इर्शादकडे विचारपूस सुरू केली पण त्याच्याकडून काहीच माहिती मिळत नव्हती. मग पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन केले. घटनेच्या दिवशी तो त्याच इमारतीच्या परिसरात होता. पण मी त्या रात्री या भागात सिनेमा बघायाला आलो होतो, असे त्याने सांगितले. कुठले सिनेमागृह, कुठला शो अशा प्रश्नांची सरबत्ती फटांगरे यांनी केली. इर्शादने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर देत सिनेमागृहाचे नाव वेळ सांगितली. यातून काही निष्पन्न होणार नाही, असे पोलिसांना वाटत असतानाच फटांगरे यांनी कुठला सिनेमा असा नेमका प्रश्न केला. तेव्हाही त्याने ठामपणे बजरंगी भाईजान हे उत्तर दिले. पोलीस हताश झाले. आता दुसऱ्या मार्गाने तपास करावा लागणार असा विचार सुरू केला. फटांगरे यांनी कुतूहल म्हणून बजरंगी भाईजानची माहिती काढली. तो सिनेमा दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवार १७ जुलैला प्रदर्शित होणार होता. म्हणजेच इर्शाद खोटे बोलत होता. त्या धाग्यावरून पोलिसांनी लगेच त्याला बोलते केले आणि त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.
इर्शाद हा प्रामाणिकपणे काम करत होता. पण नंदी त्याला केवळ ६ हजार रुपये पगार देत होते. दर आठवडय़ाला मालकाकडे लाखो रुपये येत असल्याचे त्याला माहित होते. त्यातच नंदी त्याचा पदोपदी अपमान करत होते. त्यामुळे त्याच्या मनात असंतोष खदखदत होता. त्यामुळे मालकाकडे पैसे आल्यावर ते लुटायचे अशी त्याने योजना बनवली. त्याने आपले चार मित्र बबलू, प्रजापती, विष्णू डे, राहुल पांडे या चौघांना तयार केलं. प्रत्येकाला या कामाचे १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. १५ जुलै ला नंदी यांना ८ लाख रुपये मिळणार होते हे त्याने फोनवर ऐकले होते. म्हणून त्याने मग तो दिवस निवडला. पण त्या दिवशी नंदी यांना संबंधित ग्राहकाकडे पोहोचण्यास उशीर झाल्याने त्यांना पैसे मिळालेले नव्हते. कदाचित ते लवकर पकडले गेले नसते पण इर्शादने सलमान खानच्या बजरंगी भाईजानचे नाव घेतले आणि तो स्वताच जाळ्यात अडकला.

Story img Loader