गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या तीन चित्रपटांची तुफान चर्चा आहे. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट ठरले आहेत. या चित्रपटांवर विविध समीक्षक आणि कलाकार त्यांची मत मांडताना दिसत आहेत. नुकतंच दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर याबाबत त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे. ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची तुलना करण्यावरुन त्यांनी प्रेक्षकांवर निशाणा साधला आहे.
दिग्दर्शक विजू माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी विजू माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांवर त्यांचे मत मांडले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
विजू माने यांची फेसबुक पोस्ट
कुठे चाललो आहोत आपण ?
सध्या जाती धर्माच्या भिंती आणखी मजबूत करण्याचं जे काम सुरु आहे ते पाहून हाच प्रश्न मनात येतो माझ्यासारख्याच्या. कुठे चाललो आहोत आपण ? पावनखिंड विरुध्द झुंड विरुध्द काश्मीर फाईल्स ? ही कुठली विद्वेषाची लढाई लढता आहात? काय साध्य होणार आहे ह्याने? मी स्वतःला उजवा डावा पुरोगामी वगैरे मानत नाही. मी माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देणारा आहे. एक सिनेमा बनतो त्यावर अम्मुक एका जातीचा शिक्का लावण्यापेक्षा सिनेमा म्हणून का पाहिलं जात नाहीय ? सिनेमा म्हणून जर आवडला नाही तर तो प्रत्येकाच्या आवडी निवडीचा भाग आहे असं समजून त्यांच्या मताचा आदर का केला जात नाही ? शोले न आवडणारी माणसं आहेतच कि, फक्त त्यांनी जय विरू आणि गब्बरची जात नव्हती पहिली.
‘मेरे देश कि धरती सोना उगले’ हे गाणं ऐकलं नाही तर तू देशभक्त नाहीस असा शिक्का नव्हता मारला. कुठून आलंय हे सगळं हे तुम्हालाही नीट कळत असेल. चीथावाणाऱ्या पोस्टचं प्रोफाईल अनेकदा लॉक असतं. त्यांच्या एखाद दोन पोस्ट visible असतात. अर्थात ती अस्तित्वातली व्यक्ती नसतेच. शेवटी आय टी सेल हा काही आता एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी राहिली नाही. जशास तसे उत्तर देणारे इकडेही होते आणि तिकडेही होते. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलंय. विष पेरणारे इथेही आहेत आणि तिथेही, जे माझ्यामते अत्यंत भयानक आहे.
रशिया युक्रेन युध्दाहून भयानक आहे. होय, ही अतिशयोक्ती नव्हे. घायाळ शरीरावरचे घाव भरतात, किंवा शरीर मृत होतं. घायाळ मनावरचे घाव चिरंतन राहतात, आणि ती जखम संसर्गजन्य बनवतात. जातीचा आणि धर्माचा अभिमान असायलाच हवा, तो दुराभिमान आणि द्वेष बनला की त्याचं विष बनतं. अमुक एका जातीत किंवा धर्मात जन्माला आलोय ह्यात माझं कर्तृत्व काय? आणि माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगताना इतर जाती धर्मांना तुच्छ् किंवा अन्यायकारी ठरवण्याचा अधिकार मला कोण देतं? आणि आजकाल हे सगळ्यांनाच लागू होतंय, सवर्ण किंवा असवर्ण. कुणी आरक्षणाच्या नावाने ठणाणा करतो तर कुणी पूर्वापार पिचलेल्या अवस्थेचं भांडवल करतोय. मागे कुठेतरी वाचलं होतं कलियुगाच्या अंताबद्दल. असं म्हणतात कली ज्यावेळी ब्रह्माला भेटायला गेला त्यावेळी त्याच्या एका हातात लिंग आणि एका हातात जीभ होती. ह्या दोन गोष्टींमुळे कलियुगाचा अंत होणार आहे. ही जरी रचित कथा मानली तरी कलीच्या हातात सोशल मीडिया का दिला नसेल असं वाटून गेलं. आजकाल सोशल मिडियावरचे गटतट पाहता. विश्वाचा अंत जवळ आलाय असंच वाटतं.
हे उद्विग्न शब्द काही समविचारी माणसांना ऐकवले. त्यांच्या चर्चेत असं ठरलं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी, आणि भारतीयत्व ह्यावर विश्वास असणाऱ्या माणसांचा सुध्दा एक गट (राजकीय पक्ष अथवा कुठलीही संघटना नव्हे.) असणं गरजेचं आहे. नाहीतर लयाला जाताना आपण केवळ बघ्याच्या भूमिकेत होतो ही बोच स्वस्थपणे मरूही देणार नाही. जे माझ्या विचाराशी सहमत असतील, त्यांनी अत्यंत विनयपूर्वक आपापल्या सोशल माध्यमातून जाती धर्माला फाटा देऊन, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी मूळ विषयांवर बोलत जाऊयात. तेही शक्य नसेल तर जाती धर्माच्या विखारी पोस्ट पासून स्वतःला आणि ज्यांची काळजी वाटते अशांना लांब ठेवूयात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले (ह्यात कुणाचंतरी नाव नाही म्हणून भांडू नका, त्या नावाचे विचार पसरवा) ह्यांना वाटून घेण्यापेक्षा ह्यांचे विचार वाटून घेऊयात. बदल शक्य आहे. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतो. #माणुसकी_जिंदाबाद, असे ते म्हणाले.
दरम्यान विजू मानेंनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ते एक कविता ऐकवताना दिसत आहेत. त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ आणि ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेक नेटकरी त्यांच्या या पोस्टचे कौतुक करताना दिसत आहे.