रेश्मा राईकवार

बाईपण साजरं करणारे चित्रपट मराठीत लागोपाठ यावेत हा सुखद धक्काच. या चित्रपटांचं उत्तम दिग्दर्शन, कलाकारांनी केलेल्या अजोड भूमिका या जमेच्या बाजू आहेतच. आणि तरीही या चित्रपटांचं श्रेय त्यांच्या लेखिकांनाही द्यायला हवं. करोनाकाळ नुकताच कुठं मागं टाकून चित्रपटगृहात जमलेल्या प्रेक्षकांना इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाच्या कथेनं, या कथेत एकत्र आलेल्या सात मैत्रिणींनी चांगलीच भुरळ घातली. घराघरांतल्या स्त्रीला ‘झिम्मा’ने ओढून चित्रपटगृहापर्यंत आणलं. नाना तऱ्हा, नाना ढंग, नाना कळा असलेल्या आणि कुठलंही नातंगोतं नसताना एकत्र आलेल्या या सात बायकांची पहिली ट्रीप प्रेक्षकांना आवडली. आता ट्रीपच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या बायकांचं पुढे काय झालं? याची कथा सांगणारा ‘झिम्मा २’ पहिल्या चित्रपटापेक्षा आणखी एक पाऊल पुढे जात स्त्रीमनांचे कवडसे दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

सिक्वेलपटांची जादू ही की आधीच लोकांच्या मनात घर करून बसलेल्या पात्रांची पुढची गोष्ट सांगण्याची संधी त्यातून मिळते. मात्र पुढची गोष्ट आधीच्या गोष्टीइतकीच लोकांना आवडेल किंवा त्याच दर्जेदार पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडली जाईल याची तशी काही खात्री देता येत नाही. त्यामुळे सिक्वेलपट पाहताना भ्रमनिरास होण्याची शक्यता थोडी अधिक असते. ‘झिम्मा २’ त्याबाबतीत अपवाद ठरला आहे. पहिल्या चित्रपटापेक्षा दुसऱ्या चित्रपटात आपल्या पात्रांचा तेही स्त्री पात्रांचा भावनिक आलेख अधिक प्रगल्भतेने मांडण्यात लेखक – दिग्दर्शक जोडगोळी कमालीची यशस्वी ठरली आहे. इंदू आजीचा वाढदिवस साजरा करण्याचं आणि त्यासाठी तिच्या या ट्रीपवाल्या मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचं आवतान कबीरला मिळतं. पुन्हा एकदा देवाचं नाव घेत कबीर या सगळय़ांना एकत्र घेऊन नव्या आठवणींच्या प्रवासाला सुरुवात करतो. इंदू, कृत्तिका, निर्मला, वैशाली आणि मीता या पाचहीजणींमध्ये घट्ट मैत्रीचा बंध आहे. एकमेकींच्या स्वभावाविषयी, आवडी-निवडी, मत-मतांतरं या सगळय़ाबद्दल या पाचहीजणींना  आणि त्यांची एकत्र मोट बांधणाऱ्या कबीरला चांगली जाण आहे. त्यामुळे सिक्लेलपटाची सुरुवात होते तेव्हा या पाच मैत्रिणी एका क्षणात एकमेकांना बिलगतात, त्यांच्यात परिस्थितीमुळे असलेलं अंतर गळून पडतं. या पाचजणांमध्ये कथेच्या गरजेनुसार दोन नवीन मैत्रिणींचा आणि एका नवीन परदेशी मित्राचा समावेश झाला आहे. निर्मलाची नवीकोरी, मनमिळाऊ, बोलघेवडी सून तान्या आणि वैशालीची सदानकदा कपाळावर आठय़ा असलेली भाची मनाली या दोघींचा नवा नवा प्रवेश चित्रपटात आहे.

हेही वाचा >>>… म्हणून माझा अभिनयाकडे प्रवास, अभिनेते- दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांची फिरकी

चित्रपट पाहताना पहिल्या चित्रपटाशी तुलना नाही म्हणता येणार पण काही गोष्टी जोडून घेणं मनातल्या मनात सुरू असतं. त्यामुळे त्या तुलनेत इथे चित्रपटाचा वेग हा सुखावणारा आहे. मुळात इथे पाचजणींची ओळख आधीच झाली आहे. दोन नवीन व्यक्तिरेखांमध्ये एकीची उपकथा आहे तर दुसरी आपल्या सासूबरोबरच्या नात्याचा तामझाम सांभाळत सहजपणे तिच्या मैत्रिणींमध्ये रमताना दिसते. त्यामुळे प्रत्येकीच्या आपल्या कथेचे पदर जोडून घेण्यापेक्षा त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांसह पुढच्या प्रवासातील त्यांचे टप्पे, एकमेकांना समजून घेतानाही कधीमधी उडणारे खटके, कधी माया असा एकेक भावनेचा पदर उलगडत जातो. इंदूच्या आयुष्यातील वयामुळे आलेला टप्पा, बहीण-मुलगी, मैत्रिणी सगळे असताना आणखी कोण कशाला हवंय ही भावना घेऊन वावरणाऱ्या मीताला एखादा चांगला मित्रही आपल्या आयुष्यात असू शकतो याची झालेली जाणीव, निर्मला आणि तान्या या सासू-सुनेचं खुलत जाणारं नातं, मनालीला समजून घेताना वैशालीची होणारी दमछाक या सगळय़ाच गोष्टी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी जाणवणाऱ्या आहेत. इथे या नात्यांमधली, भावनांमधली गुंतागुंत समजून घेताना स्त्री-पुरुष असा भेदही गळून पडतो. मीताला समजून घेताना कबीरला त्याच्या आईच्या भावभावनांची जाणीव होते, या छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून स्त्री-पुरुष या पलीकडे आपण त्या मानवी भावभावनांशी जोडून घेऊ शकतो हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणता येईल.

‘झिम्मा’ची मांडणी करताना त्यातील भावनिक नाटय़ाला धक्का न लावता आणि ते अतिरंजित न करता हलक्याफुलक्या प्रसंगांची केलेली पेरणी यामुळे एकूणच चित्रपट निखळ मनोरंजन करतो. काही अनावश्यक प्रसंगही यात आहेत किंवा त्या प्रसंगातून जे अपेक्षित होतं ते भलत्याच प्रसंगातून झाल्याचं लक्षात येतं. संगीताच्या बाबतीतही ‘मराठी पोरी’ हे एकच गाणं भाव खाऊन जातं. अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट वरचढ आहेच. निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू ही जोडीही भन्नाट. क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव सगळय़ांनीच त्यांच्या व्यक्तिरेखा सहजतेने पुढे नेल्या आहेत. मैत्रीच्या नात्याने घट्ट बांधली गेलेली मनं इतकी एकमेकांशी जोडली गेली आहेत की आपल्या घरच्यांपेक्षाही त्यांचं आपल्याबरोबर असणं अधिक गरजेचं वाटतं. आजच्या काळात रक्ताच्या नात्यांपलीकडे माणुसकीच्या नात्याने जोडले जाणारे बंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. ‘झिम्मा २’ हा अशाच सुंदर, मनमोकळय़ा नात्यांची अनुभूती देणारा निखळ रंजक चित्रपट आहे.

झिम्मा २

दिग्दर्शक – हेमंत ढोमे

कलाकार – क्षिती जोग, निर्मिती सावंत, रिंकू राजगुरू, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव.

Story img Loader