डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या आयुष्यावर असलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास अभिनेते आणि या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका करणारे नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.
त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चित्रपटात डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे, संगीतकार राहुल रानडे, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, बिझनेस हेड निखील साने या वेळी उपस्थित होते. डॉ. प्रकाश आमटे यांचे आयुष्य कायमच सर्वाना प्रेरणा देत असल्याचे सांगून पाटेकर म्हणाले की, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी हे दोघे गेली ४० वर्षे कोणतीही तक्रार न करता सगळ्या अडचणींवर मात करत हेमलकसा येथे आनंदाने काम करत आहेत. त्यांना असे जगताना पाहून आयुष्य काय असते, याची खऱ्या अर्थाने जाणीव होते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका साकार करणे हे माझ्यासाठी आव्हान आणि एक मोठी जबाबदारीही होती. ही जबाबदारी पेलताना मला माझ्यातील माणूसपणाची नव्याने जाणीव झाली. डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले, आम्ही जे काही करतोय, ते महान कार्य नाही तर ती आमची सामाजिक जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते तर डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, या सर्व गोष्टी आपण जीवनात प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या आणि आता या चित्रपटाच्या निमित्ताने त्या पुन्हा अनुभवायला मिळताहेत, याचा प्रत्यय आला, असे सांगितले. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी बाबा आमटे यांची भूमिका साकारली आहे. झी टॉकीज आणि एस्से व्हिजन यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.

Story img Loader