‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक साधणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती – लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. २००१ साली रंगभूमीवर आलेले परेश मोकाशी यांचे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आजही या नाटकाची आठवण काढणाऱ्या प्रेक्षकांना आता तीच कथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक आणि ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे भरघोस यश असा दुहेरी आनंद साजरा करणाऱ्या परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘मु.पो.बोंबिलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब’ या चित्रपटाची घोषणा करून त्याचे पहिलेवहिले पोस्टरही प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केेले.

हेही वाचा :पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

चित्रपटाच्या पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटिशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, असा अदमास रसिकांना बांधता येतो. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.

‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक धक्का होता! बोंबिलवाडीसारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना…’ असं सांगत चित्रपटाचं काम सुरू झालं असून लवकरच चित्रपट घेऊन येऊ, अशी आनंदाची भावना परेश मोकाशी यांनी व्यक्त केली.

तर ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक पाहिले तेव्हा आपली हसून हसून पुरेवाट झाली होती आणि त्याचवेळी यावर चित्रपट झाला तर तो किती उत्तम होईल, असा विचार मनात चमकून गेल्याची आठवण मधुगंधा कुलकर्णी यांनी सांगितली. इतर चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांची भेट व्हायची तेव्हा त्यांच्याकडूनही हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याची मागणी केली जायची. त्यामुळे या नाटकावर एक चित्रपट नक्की केला पाहिजे. नाटकाच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे कथा फुलवताना काही गोष्टी दाखवता येत नाहीत. चित्रपटात त्या गोष्टी दाखवून विनोदाची एक वेगळी उंची गाठता येईल असे वाटल्याचेही मधुगंधा यांनी सांगितले. अर्थात परेश यांनी नाटक जसेच्या तसे उचलून चित्रपट न करता त्यावर चित्रपटाचे संस्कार केले आहेत. त्यामुळे हा चित्रपट अत्यंत वेगळा आणि मजेशीर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या विवेक फिल्म्सच्या भरत शितोळे यांनीही आपल्या मातीतली गोष्ट, तिथे येणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरची पात्रं आणि त्यातून होणारी गंमत यात अनुभवता येणार आहे असे सांगितले. निर्माता म्हणून पहिल्याच प्रयत्नात ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटाचा भाग होता आल्याबद्दल भरत शितोळे यांनी आनंद व्यक्त केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie on mukkam post bombilwadi marathi drama to be made after 24 years css