मुंबई : गेली चार वर्षे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट निर्मितीला राज्य शासनाला अजून मुहूर्तच मिळेना. आता चित्रपट निर्मिती कंपनीबरोबर केलेला करारनामा संपुष्टात आल्यामुळे पुन्हा ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. नव्याने पुरवणी करारनामा करण्यात येणार आहे, तो पर्यंत चित्रपट निर्मितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना १४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खुल्या बाजारातून ईनिविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे. इलोक्योन्स प्रा. लि. या संस्थेची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली. संस्थेमार्फत चित्रपटाच्या संहिता लेखनाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याला राज्य शासनाने नेमलेल्या तज्ञ समितीने मान्यता दिली.राज्य शासनाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागाकडे चित्रपट निर्मितीसंबंधीची जबाबदारी सापविण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीकरिता ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केलेल्या करारनाम्यानुसार सप्टेंबर २०१९ पर्यंत चित्रपट पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. आता पुन्हा सप्टेंबर २०१९ पासून चित्रपट निर्मिती संस्थेसोबत पुरवणी करारनामा करण्यात येणार असून तो पर्यंत चित्रपट निर्मितीस तांत्रिकदृष्टीने मुदतवाढ देण्यात येत आहे, असे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केलेल्या शासन आदेशात नमूद केले आहे. नवीन पुरवणी करारनाम्यामप्रमाणे चित्रपट पूर्ण करण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत केल्याच्या तारखेपासून ९ महिन्यांची सुधारीत मुदत चित्रपट निर्मिती संस्थेस देण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.