सबंध समाजाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे याची चीड वेगवेगळ्या आंदोलनातून व्यक्त झाली, नेहमीच होत आली आहे. परंतु, कळत-नकळत सर्वसामान्य माणसेही भ्रष्टाचारी व्यवस्थेचा भाग बनली आहेत असे जाणवते. एका सुखवस्तू दाम्पत्यामधील नात्याच्या ठिकऱ्या उडण्यासाठी हा भ्रष्टाचार कसा कारणीभूत ठरतो याचे अतिशय तरल, सूक्ष्म आणि सूचक पद्धतीने चित्रण करणारा ‘ए रेनी डे’ हा चित्रपट आहे. छायालेखन आणि ध्वनी यांचा अचूक मेळ साधल्याने प्रेक्षकाला दृक्श्राव्य मेजवानी देणारा हा चित्रपट आहे. सबंध चित्रपटातील घटना, अनिकेत-मुग्धा यांच्या मनात उठलेले वादळ या सगळ्याला पाऊस साक्षीदार आहे. एखाद्या व्यक्तिरेखेसारखा पाऊस हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग बनून प्रेक्षकांसमोर येतो. ध्वनी हाही एकप्रकारे व्यक्तिरेखेसारखा चित्रपटात आला आहे.
अनिकेत आणि मुग्धा हे गोव्यात आलिशान, प्रशस्त घरात राहणारे सुखी दाम्पत्य. कॉपरेरेट कंपनीत उच्च पदावर नोकरी करणारा अनिकेत महत्त्वाकांक्षी आहे. जगातील सगळी सुखं त्याला स्वत:साठी आणि आपली बायको मुग्धासाठी मिळविण्याचा काहीसा अतिरेकी हव्यास आहे. मुग्धा एक गृहिणी आहे. अनिकेतची बढती आणि मुग्धा आई होणार आहे अशा दोन गोड बातम्या घेऊन अनिकेत आनंदात घरी येतो. मुग्धा आषाढातल्या घनगर्द पावसात भिजून नुकतीच आरशासमोर येऊन उभी राहते. अनिकेत मुग्धाला दोन्ही गोड बातम्या सांगतो आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी काय काय करायचे ठरविले आहे याची मोठी यादी अनिकेत अतीव आनंदात मुग्धाला सांगतो. परंतु मुग्धाला आनंदही होत नाही नि दु:खही. ती अनिकेतच्या लहानपणची एक आठवण त्याला सांगते. अनिकेत ती आठवण ऐकून चपापतो पण दुर्लक्ष करतो. परंतु अनिकेतच्या आयुष्यातील पूर्वी घडून गेलेल्या घटना याबद्दल मुग्धा त्याला सांगू लागते आणि अनिकेत गोंधळून जातो. तो आपल्या मानसोपचारतज्ज्ञ मित्राची म्हणजे अजिंक्य देवची भेट घेऊन त्याला याबाबत सांगतो. अनिकेतच्या बाबतीत घडलेल्या, त्याने पद, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी केलेल्या कंपनीच्या कामातील भ्रष्टाचाराच्या घटना आणि अन्य भयंकर घटनांमुळे मुग्धा-अनिकेत यांच्या सुखी कुटुंबात संघर्ष होतो. त्यांच्या दोघांच्याही आनंदावर विरजण पडते. आपल्या बायकोला आपण कधीही सांगितल्या नाहीत अशा घटना तिला तंतोतंत तपशीलवार कशा समजल्या म्हणून तो अनिकेत अस्वस्थ होतो.
चित्रपटाची गोष्ट छोटीशी आहे. परंतु कॉपरेरेट कंपन्यांचा खोटेपणा, प्रसंगी आपले ईप्सित साध्य करण्यात मोडता घालणाऱ्या व्यक्ती, संघटना यांना चिरडून टाकण्याची वृत्ती यावर चित्रपट प्रकाशझोत टाकतो. मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे यांनी अतिशय सजगपणे मुग्धा आणि अनिकेत या व्यक्तिरेखा परिणामकारकरीत्या साकारल्या आहेत. चित्रपटाची लांबी कमी असली तरी आशय आणि सूचक पद्धतीने केलेली मांडणी यामुळे आजच्या समाजातील भ्रष्टाचारी व्यवस्था आणि त्याचा एक भाग असलेले लोक हे आपल्या बाजूला किती बेमालूमपणे सगळे राबवले जात आहे याची जाणीव प्रेक्षकाला तीव्रतेने करून देतो.
दिग्दर्शन-लेखन-छायालेखन-ध्वनी आणि संकलन यांच्या मिलाफातून अप्रतिम चित्रचौकटी हे चित्रपटाचे सामथ्र्य आहे. अनिकेतच्या मेंदूतील आठवणींचे कप्पे एक एक करून उलगडतात, मृणाल कुलकर्णीच्या अबोध मनात दडलेल्या घटना स्वप्न सिद्धान्तात उलगडतात. पावसाळी मेघयुक्त आकाश, छत्री, घर, तुळस, आरसा, झोपाळा, अमूर्त चित्रे याचा प्रतिकात्मक वापर केला आहे. रंगांची सूचकात्मकता दिसते. स्त्रीची करुणा, वासना ही रूपके येतात तर पुरुषी रूपके अहंकार, लोभ, क्रूरता अशी आहेत. अजिंक्य देवची व्यक्तिरेखा हे मानवी सुप्त इच्छांवर अंकुश ठेवणारी सदसद्विवेकबुद्धीची द्योतक आहे. कधी झिमझिमता कधी धुवांधार कोसळणारा पाऊस याचा दिग्दर्शकाने अतिशय समर्पक पद्धतीने वापर केला आहे.
ए रेनी डे
निर्माती – डॉ. प्रियांका बिडये तालक
कथा-दिग्दर्शन – राजेंद्र तालक
पटकथा – राजेंद्र तालक, अभिराम भडकमकर
संवाद – अभिराम भडकमकर
कला दिग्दर्शक – अजित दांडेकर
छायालेखक – संजय जाधव
संकलक – विद्याधर पाठारे
ध्वनिसंयोजन – रेसूल पूकूट्टी, अमृत प्रीतम दत्ता
संगीत – अशोक पत्की
कलावंत – मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, संजय मोने, अजिंक्य देव, किरण करमरकर, मनोज जोशी, शैला कामत, मीनाक्षी मार्टिन्स, प्रिन्स जेकब, हर्ष छाया, नेहा पेंडले, सुलभा आर्य.
अबोध मनात दडलेल्या अनुभवांचा पाऊस
सबंध समाजाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे याची चीड वेगवेगळ्या आंदोलनातून व्यक्त झाली, नेहमीच होत आली आहे.
आणखी वाचा
First published on: 02-02-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review a rainy day the film has been crafted brilliantly