डान्स बार बंदीच्या घोषणेनंतरच्या काळात बारबालांचा प्रश्न, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न, त्यांचे स्थलांतर असे अनेक विषय चर्चिले गेले. बारबाला देहविक्रयाकडे वळल्या वगैरेसारख्या प्रश्नांना चित्रपटाद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आशियाना’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने केला आहे. अशा बारबालांपैकी काही जणी सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतात या दुर्लक्षिल्या गेलेल्या विषयाला हात घालण्याचे धाडस दिग्दर्शकाने केले असून त्यासाठी त्याला गुण द्यावे लागतील. परंतु, दिग्दर्शकाचा हा प्रयत्न तोकडा पडला आहे. पटकथेची मांडणी, प्रसंगांची रचना सुयोग्य पद्धतीने करण्यात चित्रपटकर्ते कमी पडल्यामुळे चित्रपट रंजकही होत नाही, त्यामुळे परिणामकारक ठरत नाही.
अण्णा चालवीत असलेल्या आशियाना बारमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत राहणाऱ्या, क्वचित उपजीविकेसाठी आणि बहुतांशी जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या तरुणी बारबाला म्हणून काम करतात असे दिग्दर्शकाने दाखविले आहे. प्रिया ही तरुणी प्रेमात पडते आणि प्रियकरापासून तिला मूल होते, कुमारीमाता म्हणून तिला घराबाहेर पडावे लागते आणि बाळाचे पालनपोषण करण्यासाठी प्रियाला बारबाला म्हणून काम करावे लागतेय. तर सायली एका तरुणाबरोबर शहरात येते आणि तो तरुण तिला बारबाला म्हणून काम करण्यासाठी जबरदस्ती करतो; तर नेहा ही गर्भश्रीमंत असूनही केवळ व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकल्यामुळे बारबाला बनते. या तिघीजणी डान्स बार बंदीच्या घोषणेनंतर सन्मानाने जगायचे ठरवितात. नेहा आपल्या घरी परतते आणि प्रिया-सायली यांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न करते. बारबालांच्या समस्या, त्यांची समाजात होणारी अवहेलना, डान्स बार-देहविक्रय-वेश्या वस्ती याच वर्तुळात पिचून जाण्याची वेळ बहुतांशी बारबालांवर डान्स बार बंदीच्या घोषणेनंतर येते. तसेच सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करताना प्रिया-सायली-नेहा यांना अनेक अडचणी येतात हेही दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे. परंतु एकूण डान्स बार बंदीची घोषणा, त्याचे परिणाम, त्यामुळे बारबालांचे वास्तव बदलले का हे दाखविलेले नाही, हे दिग्दर्शकाने फारसे लक्षात घेतलेले दिसत नाही. बारबालाही ठरविले तर सन्मानाने जगू शकतात, हा सकारात्मक दृष्टिकोन चित्रपटाद्वारे दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे एवढेच नमूद केले पाहिजे.
या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या प्रियाच्या भूमिकेतील कृतिका गायकवाड, सायलीच्या भूमिकेतील सई कल्याणकर, नेहाच्या भूमिकेतील नेहा पाटील यांनी चांगला अभिनय केला आहे. परंतु प्रसंगांची मांडणी, पटकथेतील गुंफण यांमध्ये त्रुटी राहिल्याने प्रेक्षक चित्रपटात गुंतून राहत नाही. प्रिया-नेहा-सायली कुंटणखान्यात जाऊन आक्कासमोर गृहोद्योगासाठी तरुणींना पाठविण्याचा प्रस्ताव ठेवतात तेव्हा आक्का थेट हा प्रस्ताव स्वीकारते आणि तरुणींना त्यांच्या इच्छेनुसार वागण्याची मुभा देते हा प्रसंग एकदम पटकन संपविण्यात आला आहे. मुळात असे वास्तवात घडू शकते का, इतक्या सहज कुंटणखान्यातून बाहेर पडणे शक्य असते का, बाहेर पडले तरी सन्मानाने जगण्याचा मार्ग लगेच खुला होतो का वगैरे मुद्दे चित्रपटात कुठेच अधोरेखित होत नाहीत. सकारात्मक भूमिकेतून दिग्दर्शकाने चित्रपट केला असून सगळे प्रयत्न फसले तरी पुन्हा नव्याने उमेद दाखवून प्रमुख तीन व्यक्तिरेखा नव्या मार्गाच्या शोधार्थ निघतात हा शेवट सयुक्तिक झाला आहे. परंतु प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी झालेला नाही. वास्तवात डान्स बार बंदीनंतर झालेले बदल, आता डान्स बार बंद आहेत की सगळे राजरोसपणे सुरू आहेत, बारबालांना स्थलांतर करावे लागले का, यांसारखे पैलूही उलगडून दाखविणे आवश्यक होते.
प्रसंगांची गुंफण करताना मुख्यत्वे दिग्दर्शकाने बारबालांवर दलाल, पोलीस, मालक यांच्याकडून होणारा जाच, त्यांचा उपभोग घेण्यासाठी वखवखलेले लोक यांचेच दर्शन घडविण्यावर अधिक भर दिला आहे. हे तर्कसुसंगत असले तरी सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमुख तीन बारबालांच्या व्यक्तिरेखांचा संघर्ष त्यापुढे फिका ठरतो.
आशियाना
निर्माते – सागर पंडित, रजनी पंडित
कथा-दिग्दर्शन – अजित देवळे
पटकथा – अजित देवळे, सागर वानखेडे
संवाद – सागर वानखेडे
संगीत – प्रभाकर नरवडे
छायालेखन – सॅण्डी
संकलन – योगेश गोगटे
कलावंत – कृतिका गायकवाड, सई कल्याणकर, नेहा पाटील, यतीन कार्येकर, आर्यन कपूर, राज पाटील, प्रफुल्ल सामंत, अनिल गवस, संजीवनी जाधव, काजल वशिष्ठ व अन्य.
तोकडे दिग्दर्शन
डान्स बार बंदीच्या घोषणेनंतरच्या काळात बारबालांचा प्रश्न, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न, त्यांचे स्थलांतर असे अनेक विषय चर्चिले गेले.
First published on: 02-11-2014 at 06:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review aashiyana