बॉलीवूडची पहिली महिला गुप्तहेर पडद्यावर अवतरणार असल्यामुळे ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाबद्दल खूप औत्सुक्य प्रेक्षकांना होते. ‘द डर्टी पिक्चर’ आणि त्यानंतरची विद्या बालन अशी स्वतंत्र प्रतिमा बनल्यामुळे हिंदीच्या रुपेरी पडद्यावरची बॉबी जासूसच्या व्यक्तिरेखेबाबतही खूप अपेक्षा होत्या. प्रेक्षकांच्या या अपेक्षा बॉबी या भूमिकेतून विद्या बालनने पूर्ण केल्या आहेत. परंतु, या महिला गुप्तहेरासाठी आवश्यक असलेला कथानकाचा बाज आणि दिग्दर्शकीय त्रुटींमुळे बॉबी जासूसपेक्षा विद्या बालनच अधिक दिसते. त्यामुळे बॉबी पास झाली आहे, पण जासूस नापास आहे, असे म्हणावे लागेल.
खासगी गुप्तहेर बनण्याची बॉबीला म्हणजेच हैदराबादच्या मुघलपुरामध्ये राहणाऱ्या बिल्किस अहमदला खूप इच्छा आहे. ‘सीआयडी’ मालिकेचा तिच्यावर खूप प्रभाव आहे. हैदराबादी मुस्लीम कुटुंबात वाढलेली असली तरी बिल्किस एकदम बिनधास्त, धीट आहे. त्यामुळेच तिला मुघलपुरामध्ये सगळेजण बिल्किसऐवजी बॉबी याच नावाने अधिक ओळखतात. ‘जासूसी’ करण्याची तिला भारी हौस आहे. अनेक गुप्तहेर संस्थांकडे ती नोकरी मागायला जाते, एक संधी द्या म्हणते, पण शिक्षणाअभावी तिला कुणी गुप्तहेर म्हणून काम देत नाही. मुघलपुऱ्यातील तिची मैत्रीण आफ्रिनचे एका तरुणावर प्रेम आहे. याबाबत आफ्रिनच्या आईला संशय आहे. म्हणून ती बॉबीला आफ्रिनवर पाळत ठेवून तिच्या प्रियकराचा शोध घ्यायला सांगते. एकीकडे आफ्रिनची आई त्यासाठी बॉबीला पैसे देत असते आणि बॉबी आफ्रिनच्या प्रियकराचे फोटो तिलाच दाखवून तिच्याकडूनही पैसे उकळत असते. बॉबीचे गुप्तेहर बनण्याचे खूळ मुघलपुरामधील सर्वाना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील वर किंवा वधूविषयी गुप्त माहिती पालकांना काढून देण्याची छोटी-मोठी कामे तिला मिळतात. परंतु, प्रसिद्ध गुप्तहेर बनण्याचे बॉबीचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. अशातच एकदा एक अतिशय गूढ स्वरूपाचे गुप्तहेराचे काम तिला मिळते. भरपूर पैसे मिळतात. त्यासाठी संबंधित व्यक्तींचा शोध घेते, मग तिला आणखी पैसे मिळतात. परंतु, बॉबीच्या अब्बांना मात्र ते पसंत नाही. बॉबीच्या खुळामुळे आणि एखाद्या तरुणासारखे बेधडक वागण्यामुळे बॉबीची बहीण नूरचे लग्न जुळत नाही म्हणून घरात नेहमी वाद होतात. बॉबी मात्र ‘जासूसीगिरी’ करण्यात सिनेमाभर दंग राहते. परंतु, एका प्रकरणामुळे गुप्तहेरगिरी करणे येरागबाळ्याचे काम नोहे याची जाणीव तिला होते.
मूळचा कला दिग्दर्शक असलेल्या समर शेखने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. परंतु, पहिल्याच चित्रपटात फक्त विद्या बालनला समोर ठेवून वेगवेगळ्या पोशाखात, वेशभूषेत तिला दाखविण्याच्या पलीकडे चित्रपट नेता आलेला नाही. मुस्लीम पुराणमतवादी कुटुंबात वाढलेल्या मुलीला एकदम गुप्तहेर का बनावेसे वाटते, तिच्या घरच्यांचा विरोध असतानाही बॉबी गुप्तहेरगिरीचे काम का करते याची कोणतीही पाश्र्वभूमी दाखविण्यात आलेली नाही.
एकामागून एका दृश्यातून बॉबी जासूस वेगवेगळे पेहराव करते. परंतु, मुलीसारखे नटण्याची हौस बॉबीला नसताना ती वेगवेगळ्या वेशभूषा कशा परिधान करते, त्यासाठी तिला कुणी मदत करते का वगैरे काहीही दाखविलेले नाही.
‘जासूसी’साठी आवश्यक असलेल्या पटकथेचा बऱ्याच अंशी अभाव असल्यामुळे मध्यांतरानंतर चित्रपट भरकटतो. बॉलीवूडपट म्हणून बॉबी आणि तसव्वूर यांचे प्रेम, ते प्रेम दाखविण्यासाठी २-३ गाण्यांचा भडिमार यामुळे चित्रपट रटाळ झाला आहे. एखादे प्रकरण आपल्या हिकमतीने उलगडून दाखविणारी बॉबी जासूस कुठेही दाखविलेली नाही. त्यामुळे गंमत म्हणून बॉबी गुप्तहेरगिरीचा छंद जोपासते असेच प्रेक्षकाला वाटत राहते.
विद्या बालनने बॉबी उत्तम साकारली आहे. तसव्वूर ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अली फझलनेही साहाय्यक व्यक्तिरेखा चांगली साकारली आहे. परंतु, घटनाप्रसंगांची रोमांचक मांडणी, गुप्तहेरगिरी करतानाचे नाटय़ याचा पटकथेत संपूर्ण अभाव असल्यामुळे चांगली व्यक्तिरेखा साकारूनही विद्या बालनच्या आधीच्या भूमिकांपेक्षा बॉबी ही व्यक्तिरेखा वरचढ ठरू शकलेली नाही.
बॉबी जासूस
निर्माते – दिया मिर्झा, साहिल संघा, रिलायन्स एण्टरटेन्मेंट
दिग्दर्शक – समर शेख
पटकथा – संयुक्ता चावला शेख
संगीत – शंतनू मोईत्रा
छायालेखन – विशाल सिन्हा
संकलन – हेमल कोठारी
कलावंत – विद्या बालन, अली फझल, प्रसाद बर्वे, अर्जन बावेजा, सुप्रिया पाठक, बेनाफ दादाचांदजी, किरणकुमार, आकाश दाहिया, तेजस महाजन, गंगाधर पांडे, राजेंद्र गुप्ता, तन्वी आझमी व अन्य.

Story img Loader