ब्रॅण्ड एसआरकेचा दिवाळी ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण म्हणून लेखक-दिग्दर्शकांना या कुतूहलापोटी तरी चांगला सिनेमा बनवावा असे अजिबात वाटलेले नाही. हॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे कथाबीज वापरून बनविलेला ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट फराह खानच्या तद्दन दिग्दर्शनाखालचा चित्रपट ठरलाय. चित्रपट चांगला असतो किंवा वाईट असतो असे दोनच गट असतात असे मानले जाते. त्यात बरा ही मधली वर्गवारी शाहरुखच्या या चित्रपटाला लागू करता येईल. अर्थात हा बरा शब्द वाईटच्या जवळ जाणारा आहे हे नक्की. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तकलादू व्यक्तिरेखा, शाहरुखच्या आधी येऊन गेलेल्या चित्रपटांतील संवादांची पुनरावृत्ती आणि मांडणीतील नावीन्याचा अभाव. बिनडोक करमणूक म्हणून शाहरुखची पडद्यावरची फिल्मीगिरी आवडणाऱ्या प्रेक्षकांचा कौल या चित्रपटाला नक्कीच मिळेल यातही शंका नाही. दिवाळीलाच ‘हॅपी न्यू इयर’ म्हणताना दिग्दर्शिकेने नवं काही देण्याचा विचारच केलेला नाही.
चार्ली ऊर्फ चंद्रमोहन शर्मा दुबईतील एका आलिशान हॉटेलच्या तळघरातील तीनशे का सहाशे कोटींचे हिरे लुटण्याची योजना आखतो. चोरीचा हा कट यशस्वी करण्यासाठी रोहन हा कम्प्युटर हॅकर, खलनायकाच्या मुलासारखा दिसणारा म्हणून नंदू भेंडे, तिजोरी अक्कलहुशारीने तोडण्यात माहीर असलेला टॅमी आणि जग म्हणजेच जगमोहन प्रकाश यांना चार्ली सोबत घेतो. अटलांटिस नावाच्या आलिशान हॉटेलच्या तळघरात असलेली अत्याधुनिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून तेथील तिजोरीमधील हिरे लुटण्याचा हा कट ठरतो. चार्लीचा शत्रू आणि त्याच्या वडिलांचा मारेकरी चरण ग्रोव्हर याच्याजवळील हिरे लुटायचे ही योजना. पण ही योजना यशस्वी करण्यासाठी आधी चार्ली आणि त्याच्या चमूला जागतिक नृत्य स्पर्धेत सहभाग घ्यावा लागतो. मग नृत्य शिकविणारी म्हणून एका कणाहीन नृत्यांगनेची मोहिनी जोशीची निवड केली जाते. तिला या कटाबद्दल काहीच सांगितले जात नाही. भरपूर सराव केल्यानंतर कागदावर यशस्वी झालेला चोरीचा कट प्रत्यक्षात दुबईतील हॉटेलात राहून अमलात आणला जातो. या कटाभोवती पण नृत्यस्पर्धेच्या अनुषंगाने चित्रपट पडद्यावर उलगडतो.
ब्रॅण्ड एसआरकेचा चित्रपट म्हणून चार्लीच्या भूमिकेत पहिल्याच दृश्यात आठ पॅक अॅब्ससह शाहरुख ‘फ्रि स्टाइल’ मारामारी करताना पाहायला लागतो. मौल्यवान हिऱ्यांची चोरी सुरक्षा व्यवस्था भेदून करायची आणि मालामाल व्हायचे हा हिंदी चित्रपटांचा यशस्वी फॉम्र्युला प्रेक्षकांच्या चांगल्याच माहितीचा असला तरी करमणुकीसाठी असा चित्रपट सातत्याने पाहण्याची प्रेक्षकांना सवय आहेच. परंतु, त्यासाठी ‘मेरा भारत महान’चा नारा देऊन, नायक आणि त्याच्या कटात सामील झालेल्या व्यक्तिरेखांना कौटुंबिक, भावनिक तसेच देशभक्तीचा मुलामा देण्याचा प्रकार फराह खानच करू जाणे. मनमोहन देसाई यांच्या चित्रपटाचा फॉम्र्युला आणि त्याला हॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे कथाबीज आणि सादरीकरण यांची जोड देण्याचा प्रयत्न दिग्दर्शिकेने केला आहे.
प्रचंड लांबलचक आणि म्हणून कंटाळवाण्या ठरलेल्या या चित्रपटात गाण्यांच्या भडिमाराने प्रेक्षक बेजार होतो. इंग्लिश बोलता येत नसल्यामुळे मोहिनी ही नृत्यांगना चार्लीच्या प्रेमात पडते असे दाखविले आहे. कौटुंबिक-भावनिक मुलामा देत सादर केलेल्या चोरीच्या कथेत हिंदी रुपेरी पडदा असला तरी दिग्दर्शिकेने चार्ली-मोहिनी यांच्यातील प्रेमकथा उलगडलेली नाही हे मात्र प्रेक्षकावर उपकारच झाले म्हणायचे. नाहीतर तीन तासांचा हा प्रचंड लांबलचक चित्रपट सहज चार तासांचा झाला असता. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुख-दीपिकाची जोडी जमली होती. परंतु, या चित्रपटामध्ये मोहिनी या व्यक्तिरेखेला कोणताही आगापिछा नसतानाही दीपिकाने फक्त बिगबजेट, ब्रॅण्ड एसआरके चित्रपटात काम करावे याचे आश्चर्य न वाटले तरच नवल. टॅमी या भूमिकेद्वारे बोमन इराणीने अनेक ठिकाणी धमाल उडवून दिली आहे. नावीन्याचा अभाव, कौटुंबिक-भावनिक-देशभक्तीचा पदर देऊन तयार केलेला हा चित्रपट एक लांबलचक टाइमपास ठरतो.
हॅपी न्यू इयर
निर्माती – गौरी खान
कथालेखन व दिग्दर्शिका – फराह खान
लेखक – फराह खान, अलथीया कौशल
संवाद – मयूर पुरी
संगीत – विशाल शेखर
छायालेखन – मानुष नंदन
कलावंत – शाहरुख खान, दीपिका पदुकोण, बोमन इराणी, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शहा, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, मोहन कपूर, दीनो मोरिया व अन्य.
अति लांबलचक टाईमपास
ब्रॅण्ड एसआरकेचा दिवाळी ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे.
First published on: 26-10-2014 at 09:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review farah khan in lengthy entertainment