भारत-पाकिस्तान यांचे संबंध, फाळणीची वेदना, राजकीय स्तरावर उभय देशांचे तणावपूर्ण संबंध, तीव्र धर्मभावना या सगळ्या पाश्र्वभूमीचे अनेक हिंदी चित्रपट, मुख्यत्वे प्रेमपट येऊन गेले आहेत. त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि हिंदी सिनेमाची लोकप्रियता आपल्या देशाएवढीच पाकिस्तानमध्येही आहे हे अधोरेखित करणारा ‘फिल्मीस्तान’ नर्मविनोदी, साधा सरळ सिनेमा आहे.
भारत-पाकमधील सीमेवरील गावात घडणाऱ्या गोष्टीवरचा सिनेमा म्हणजे खूप काहीतरी गंभीर असतात हा पूर्वीच्या चित्रपटांचा समज या चित्रपटाने पूर्णपणे खोटा ठरविला आहे. साधेसुधे कथानक, त्याची सरळसोट मांडणी तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे स्मित कायम ठेवणारा निखळ नर्मविनोदी प्रकारचा चित्रपट आहे.
सनी हा पंजाबी तरूण मुंबईच्या चित्रपटसृष्टीत अभिनेता बनण्यासाठी येतो. परंतु, शेकडो ऑडिशन्स देऊनही त्याला एकही प्रमुख तर जाऊदे पण दुय्यम भूमिकाही चित्रपटात मिळत नाही. मग तो टीव्ही मालिकांच्या प्रॉडक्शनसाठी काम करतो. एका अमेरिकन गटाबरोबर माहितीपटासाठी राजस्थानला सीमेलगतच्या प्रदेशात जाण्याची त्याला संधी मिळते. त्या दरम्यान अतिरेकी त्याचे अपहरण करतात. मग तो पाकिस्तानातील सीमेलगतच्या एका खेडय़ात आफताबच्या घरात बंदीवान म्हणून राहतो. मेहमूद आणि जवाद हे दोन अतिरेकी त्याच्या गस्तीसाठी राहतात.
सनी हा पक्का बॉलीवूडप्रेमी असल्यामुळे मैंने प्यार कियापासून ते कुछ कुछ होता है, दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन, शाहरूख खान अशा सगळ्याच कलावंतांचे चित्रपट म्हणजे त्याचा जीव की प्राण असतो. आफताब हा सीमेपलिकडून हिंदी सिनेमांच्या पायरेटेड सीडी आणून विकण्याचा धंदा करीत असतो. त्यामुळे दोघांची बॉलीवूडदोस्ती एकदम जमते. मेहमूद आणि जवाद या अतिरेक्यांबरोबरचे सनीचे वागणे, त्यांचे सनीशी वागणे-बोलणे, भारत-पाक क्रिकेट सामना, गावकऱ्यांबरोबर टीव्हीवर सिनेमा पाहणे अशा अनेक प्रसंगांतून दिग्दर्शकाने नर्मविनोद घडविला आहे. साधेसरळ कथानक असूनही सनीची ‘फिल्मीगिरी’ संवादांतून दाखविताना प्रेक्षकांमधून हंशा पिकतो. अतिरेक्यांनी अपहरण करून डांबून ठेवले, प्रसंगी जिवावर बेतले तरी सनीची फिल्मीगिरी काही थांबत नाही. एक प्रकारे दिग्दर्शकाने भारत-पाकमधील नागरिकांमध्ये तणाव असला तरी दोन्हीकडची संस्कृती सारखी आहे, खाद्यसंस्कृतीबरोबरच बॉलीवूडच्या चित्रपटांचे वेड पाकिस्तानी लोकांनाही भारतीयांइतकेच आहे हे अधोरेखित केले आहे. किंबहुना सिनेमा हा उभय देशांमधील एक समान धागा ठरू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न नर्मविनोदी, खुसखुशीत शैलीत दिग्दर्शकाने केला आहे. शरीब हाश्मीने साकारलेला सनी आणि इनामउलहक याने साकारलेला आफताब, त्यांची एकमेकांना पूरक अभिनयाची पद्धती यामुळे चित्रपटात धमाल येते. मेहमूद या अतिरेक्याच्या भूमिकेतील कुमूद मिश्रा आणि जवाद या अतिरेक्याच्या भूमिकेतील गोपल दत्त यांनीही मुख्य व्यक्तिरेखांना पूरक ठरतील अशा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
खुसखुशीत, नर्मविनोदी
भारत-पाकिस्तान यांचे संबंध, फाळणीची वेदना, राजकीय स्तरावर उभय देशांचे तणावपूर्ण संबंध, तीव्र धर्मभावना या सगळ्या पाश्र्वभूमीचे अनेक हिंदी चित्रपट, मुख्यत्वे प्रेमपट येऊन गेले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-06-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review filmistan