सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एक नवं वार वाहू लागलं आहे. नवनवीन विषय घेऊन नवनवीन मराठी चित्रपट येताहेत आणि त्यासोबतच येत आहे नवीन तंत्र. मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सकस होत चालला आहे. वेगवेगळी तरुण मंडळी नवनव्या कल्पना घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत व वेगवेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने मांडत आहेत. ‘नॉक नॉक एन्टरटेन्मेंट’ बॅनरखाली बनलेला ‘हॅलो नंदन’ आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दिवसेंदिवस आपण मोबाईलच्या फारच अधिन होत चाललो आहेत. तो काळाची गरज राहिला नसून एक व्यसन बनत चालला आहे. तो जर आपल्याकडे नसेल तर अस्वस्थ व्हायला होते. पण त्यातूनच काही थरार नाट्यही घडू शकते. ‘‘जर मोबाईल हरवला..तर?’’ अशा कथेवर बेतलेला चित्रपट म्हणजे “हॅलो नंदन”. तरुण नायकाभोवती गुंफलेले कथानक असलेला हा चित्रपट वेगवान कथानकाच्या जातकुळीतला आहे. ज्यांचा मोबाईल फोन आयुष्यात कधीतरी चोरीला गेला आहे, अशांनी हा चित्रपट नक्कीच पहावा आणि ज्यांचा नसेल गेला त्यांनी गेला तर काय होऊ शकतं याचा थरारक आणि तेवढाच मजेशीर अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहण्याजोगा आहे.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाइल असतो, कधी तो हरवतो किंवा चोरीलाही जातो. अनेकांच्या दृष्टीनं ती गौण बाब असते. मात्र, आपला मोबाइल हरवला म्हणून अस्वथ होणारा आणि तो शोधण्यासाठी जिवापाड प्रयत्न करणाराही कोणी असू शकतो. आपल्या हरवलेल्या मोबाइलचा शोध घेणाऱ्या अशाच एका विलक्षण तरुणाची कहाणी म्हणजे हॅलो नंदन. आयुष्य बदलून टाकेल, असा एक नंबर त्याच्या मोबाईलमध्ये असतानाच अचानक त्याचा मोबाइल चोरीला जातो. तो नंबर मिळवण्यासाठी, फोन परत मिळवणं हा एकच उपाय त्याच्यासमोर शिल्लक राहतो. पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा काही उपयोग होत नाही हे कळताच ‘नंदन’ (आदिनाथ कोठारे) स्वतःच मोबाइल शोधण्याचं ठरवतो आणि सुरुवात होते एका नाट्यमय प्रवासाची… हा शोध मोबाइल शोधण्यापलीकडे जातो आणि नंदनला ‘करप्ट सिस्टीम’विरुद्ध उभं करतो. अन्यायाविरुद्ध लढणा-या नंदनच्या तोंडी “तुम्हाला चालत असेल मला नाही चालत” अशी या चित्रपटची टॅगलाईन ऐकावयास मिळते.
सहज घडत जाणारा घटनाक्रम व त्यातून अचानक उभे राहणारे प्रसंग, त्यावर मात करत होणारा नंदनचा प्रवास, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. एका मोबाईल भोवती फिरणारं थ्रिलर कथानक या चित्रपटात रेखाटण्यात दिग्दर्शक राहुल जाधवला पुरेपूर यश मिळाल आहे. ‘झपाटलेला २’ नंतर आदिनाथ कोठारे हा चित्रपटात ‘नंदन’च्या एका वेगळ्या भूमिकेत आहे. आदिनाथच्या चांगल्या अभिनयाची झलक या चित्रपटाद्वारे पाहावयास मिळते. हिंदी मालिकांमधून परिचित असलेल्या मृणाल ठाकूरने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून तिचीही भूमिका चांगली झाली आहे. आदिनाथ कोठारे आणि मृणाल ठाकूर यांनी तरुणाईचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. नीना कुलकर्णी, अनंत जोग या ज्येष्ठ कलाकारांनी तितकीच चांगली साथ तरुण कलाकारांना दिली आहे. महेश कुडाळकर याचं सुंदर कलादिग्दर्शन हा चित्रपटाचा यूएसपी ठरला आहे. अमित राज सावंत आणि प्रफुल्ल चंद्र यांचे कथानकाला साजेसे युथफूल संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू असून, ते तरुणाईला थिरकण्यास भाग पाडते. परंतु, गाण्यामुळे कथानकाची गती कुठेही कमी न होता चित्रपटाची रंगत वाढत जाताना दिसते. मुख्य भूमिकेतील जोडी, त्याच बरोबर जबरदस्त सहायक अभिनेत्यांची फळी, पायांना थिरकायला लावणारं संगीत अशा अनेक जमेच्या बाजू “हॅलो नंदन” या चित्रपटातून जुळून आल्या आहेत. चित्रपटाचा शेवटही योग्यरित्या कथेला साजेसा असा करण्यात आला आहे. राहुल जाधवने रसिकांना चांगली कलाकृती दिली आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक चित्रपटाला भरभरून दाद देतील, यात तीळमात्र शंका नाही.
दिग्दर्शक – राहुल जाधव
निर्मिती – नवीन रमनानी, रिनु ओहलन
कथा, पटकथा आणि संवाद – सौरभ भावे
संगीतकार- ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि अमितराज
कलाकार- नीना कुलकर्णी, अनंत जोग, देवेंद्र भगत, आदिनाथ कोठारे, मृणाल ठाकूर