कलावंतांची मुले-मुली पदार्पण करणार असलेला चित्रपट म्हटला की आपोआपच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. तशाच अपेक्षा जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफच्या पदार्पणातील ‘हिरोपन्ती’ या चित्रपटाकडून होत्या. परंतु तेलुगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटात कथानकापासून कलावंतांचा अभिनय, सेट डिझाइन, रंग, कपडे, गाणी सारेच काही सरधोपट आणि जुनाच फॉम्र्युला नव्या कलावंतांसह मांडण्याचा अट्टहास केल्यामुळे ना धड सरळसोट प्रेमपट, ना धड निव्वळ हाणामारी, त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा झाला आहे.
नायकाचे नाव बबलू आहे आणि नायिकेचे नाव डिम्पी आहे. बबलू-डिम्पी यांची प्रेमकहाणी असेल या मिषाने प्रेक्षक चित्रपटागृहात जातो खरा, परंतु बबलूच्या प्रेमकहाणीऐवजी डिम्पीच्या पलायन केलेल्या बहिणीच्या मागे सगळा चित्रपट फरफटत नेला आहे.
एका पारंपरिक जाट कुटुंबातील मुलगी लग्नाच्या वेदीवरून पलायन करून प्रियकराबरोबर निघून जाते आणि त्यामुळे जाट बिरादरीमध्ये झालेला अपमान, त्याचा सूड उगवण्यासाठी मुलीचा बाप चौधरी आपली मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या शोधात भटकत राहतो. नायिका डिम्पीची बहीण रेणू स्वत:च्या लग्नातून पलायन करते आणि प्रियकराबरोबर निघून जाते. प्रियकराचा मित्र बबलूला सारे काही ठाऊक आहे असे त्याचे अन्य दोन मित्र सांगतात, म्हणून बबलूला पकडून आणले जाते. चौधरी हा नुसताच जाट नाही, तर गावातील धनदांडगा गुंड पण असतो. मुलीला पळवून नेल्याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा मुलीच्या प्रियकरालाच संपवून टाकण्याचे चौधरी ठरवितो. त्याचा थांगपत्ता लागावा म्हणून त्याच्या चार मित्रांना गुंडांकरवी तो घरी आणतो. या मित्रांपैकीच एक चित्रपटाचा नायक म्हणजे बबलू आहे. बबलूला मारूनही तो रेणू आणि तिच्या प्रियकराचा पत्ता लागू देत नाही.
दरम्यान, चित्रपटाचे नाव हिरोपन्ती असे असल्यामुळे आपला नायक बबलू मार खाऊनही अर्थातच चौधरी व त्याच्या गुंडांना अजिबात घाबरत नाही. रेणूचा पत्ता लागावा म्हणून तिची बहीण डिम्पी बबलूला माहिती विचारते आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम उमलत जाते. परंतु आपल्या बहिणीसारखे आपण कधीच पळून जाणार नाही, वडील सांगतील त्याच मुलाशी विवाह करणार, असे डिम्पी बबलूला सांगते. परंतु कधीतरी धाडस करून दाखव, प्रेमात असे सारे काही झोकून देऊन करावे लागते, असे बबलू तिला पटवून देतो.
जाट कुटुंब, त्यातील परंपरा, पंजाबी स्टाइलची गाणी, हाणामारी पण तशीच. यावरच भर दिल्यामुळे बबलू साकारणाऱ्या टायगर श्रॉफ याला पदार्पणातील चित्रपटात, कथानकात खूप कमी वाव आहे. त्यामुळे बबलू आणि डिम्पी यांचे प्रेम दाखवायला दिग्दर्शकाला फारसा अवधीच मिळालेला नाही. थोडीबहुत हिरोपन्ती करण्याचा प्रयत्न टायगर श्रॉफने केला आहे. हाणामारीच्या दृश्यांतून आपण चांगली स्टंटबाजी करू शकतो आणि कमावलेले शरीर दाखवू शकतो, एवढाच वाव टायगर श्रॉफला मिळाला आहे. त्यातून थोडीफार हिरोपन्ती त्याने दाखवली आहे. परंतु बळकट शरीर आणि कोवळा चेहरा यामुळे समीप दृश्यांमधून टायगरला अभिनय येत नाही हे प्रेक्षकांना लगेच कळते. त्यात पदार्पणातील चित्रपट असूनही टायगरला नायिका म्हणून लाभलेली अभिनेत्री कीर्ती सनोन हिचे पडद्यावरचे रूपडे आणि वावर दोन्ही भयंकर असल्यामुळे प्रेक्षकांना टायगर-कीर्तीची जोडी फारशी आवडत नाही. हिरो या जॅकी श्रॉफच्या पहिल्या चित्रपटातील बासरीचे सूर अधूनमधून वाजवले असले तरी त्या बासरीच्या संगीताचा फायदा टायगरला अजिबात झालेला नाही.
उलट हा सतत शीळ घालणारा नायक काय कामाचा, असेच प्रेक्षकाला वाटत राहते. जॅकी श्रॉफचा मुलगा म्हणून टायगरबद्दल असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा तर चित्रपट पूर्ण करूच शकत नाही. कारण अॅक्शन हिरो म्हणून तो चांगला वाटत असला तरी प्रेमी नायकाचा अभिनय करणे त्याला जमत नाही. एकीकडे तो कमावलेले शरीर दाखवतो, पण दुसरीकडे प्रेमी नायक म्हणून एकदम फिका पडत असल्यामुळे चित्रपट अगदीच मिळमिळीत झाला आहे.
हिरोपन्ती
निर्माता – साजिद नाडियादवाला
दिग्दर्शक – सब्बीर खान
लेखक – संजीव दत्ता
संगीत – साजिद-वाजिद, मंज मुसिक
छायालेखक – हरी वेदान्तम
कलावंत – टायगर श्रॉफ, कीर्ती सनोन, संदीपा धर, विक्रम सिंग, शिरीष शर्मा, प्रकाश राज, समर जयसिंग.
विझलेली हिरो‘पणती’!
कलावंतांची मुले-मुली पदार्पण करणार असलेला चित्रपट म्हटला की आपोआपच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. तशाच अपेक्षा जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफच्या पदार्पणातील ‘हिरोपन्ती’ या चित्रपटाकडून होत्या.
आणखी वाचा
First published on: 25-05-2014 at 04:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review heropanti presents a couple of gormless debutants