मराठी चित्रपट सर्वसाधारणपणे आशयघन, ‘हिरोगिरी’विना असतात. त्यामुळे ‘ग्लॅमर’चा अभाव असतो असे म्हटले जाते. याला छेद देणारा ‘लय भारी’ हा भव्य मसालापट आहे. हिंदीतल्या कलावंताला मराठीच्या रूपेरी पडद्यावर ‘लार्जर दॅन लाईफ’ भूमिका करण्याची संधी देणारा हा तद्दन मसालापट आहे. भारतीय पिटातल्या प्रेक्षकांना पिढय़ानुपिढय़ा आवडणारे नवरस असलेला चित्रपट आहे. संगीत, धडाकेबाज हाणामारी, विनोद, ‘मेलोड्रामा’ थोडक्यात रोहित शेट्टी स्टाईलचा मनारेंजनपट असेही बिरूद या चित्रपटाला लावता येईल.
प्रिन्स निंबाळकर, प्रतापसिंग निंबाळकर हे सत्चे प्रतिनिधी आणि त्यांचे नातलग संग्राम आणि त्याचे वडील हे असत्चे प्रतिनिधी. त्यांच्यातील संघर्षांची ही कथा. एक आई, तिची विठ्ठलभक्ती, विठ्ठलभक्तीचा प्रसाद म्हणून प्रिन्सचा जन्म होणे, त्यातले एक रहस्य असे सगळे सरधोपट पण भव्य, सुश्राव्य गाण्यांनी सजलेले सारे काही पडद्यावर साकारले आहे.
सुमित्रादेवी असं हिंदी नाव धारण केलेल्या मातेला वैधव्य येणे आणि मग खलनायक संग्रामचा सूड घेण्याचा मार्ग ती अवलंबते. वेगळ्या स्टाईलचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाला प्रेक्षकशरण होण्याची वेळ का यावी हा प्रश्न हा चित्रपट पाहताना प्रेक्षकाने विचारू नये. रोहित शेट्टी स्टाईलचे चित्रण, हाणामारी, भरपूर पण सुश्राव्य गाणी असे सगळे असले की कथानक चांगले हवेच कशाला? अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलावंतांनी बेतास बात काम केले आहे. प्रोमोज्मधले संवाद ऐकण्यासाठीच प्रेक्षक  चित्रपटगृहात जात असल्यामुळे नवीन काही नसले तरी मराठीत असा भव्य मसलापट तयार होणे यालाच महत्त्व आहे. चित्रपटात नायक खलनायक यांच्यातील संघर्षांचा शेवट येताना राधिका आपटेचे मादकता दाखविणारे गाणे उगाचच आणल्यासारखे वाटते. हिंदीत पुन्हा पुन्हा पाहिलेल्या गोष्टींची इतकी सहीसही नक्कल करण्याची गरज मराठीत होती का असा प्रश्न पडतो. रितेश देशमुखला या चित्रपटाने नायक बनण्याची उत्तम संधी दिली आणि त्यात तो सरस ठरलाय.
विठ्ठलभक्ती, पंढरपूरची वारी अशा गोष्टी कथानकात आणल्याने मराठी प्रेक्षकांना आपलेसे करता येईल हा विचार लेखक-दिग्दर्शकांनी केला असून पटकथेत ते चांगले जमून आले आहे. सरळ रेषेत गोष्ट सांगताना मागील घटना दोनदा दाखविल्यामुळे चित्रपटाची लांबी नको इतकी वाढली आहे. ही लांबी कमी करता आली असती तर चित्रपट अधिक रंजक झाला असता.
रितेश देशमुखने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहून बोललेले संवाद थेट अमिताभ बच्चनची आठवण करून देतात. धडाकेबाज हाणामारी, मनोरंजनाचा मसाला रोहित शेट्टीच्या सिनेमाप्रमाणे आहे हेही प्रेक्षकाला लगेच समजते. पिटातल्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा भव्य मसालापट आहे हे नक्की. सुमधूर संगीत ही जमेची मोठी बाजू असलेल्या या चित्रपटात अप्रतिम छायालेखनाची साथ आणि मोजके खटकेबाज संवाद यामुळे मनोरंजन निश्चितच होते. अर्थात मराठीत बिगबजेट पठडीबाज भव्य मनोरंजनपट करण्याचे श्रेय या चित्रपटाला द्यावे लागेल. यापूर्वीही भव्य चित्रपट मराठीत मोजके झाले असले तरी हिंदी सिनेमा, दाक्षिणात्य सिनेमा, त्याला रोहित शेट्टी स्टाईल मांडणीची जोड, अत्युच्च निर्मितीमूल्ये, हिंदीतील प्रमुख कलावंताला घेऊन मराठी चित्रपट आला नव्हता. तिकीटबारीवर हमखास यश मिळविण्यासाठी निर्माण केलेला बिनडोक पण भव्य मसालापट पिटय़ातल्या प्रेक्षकासाठी तयार करण्यात आलाय असेच म्हणावे लागेल.
झी टॉकीज प्रस्तुत
लय भारी
निर्माते – जितेंद्र ठाकरे, जेनेलिया देशमुख, अमेय खोपकर
दिग्दर्शक – निशिकांत कामत
कथा – साजिद नाडियादवाला
पटकथा – रितेश शहा
संवाद – संजय पवार
संगीत – अजय-अतुल
छायालेखन – संजय मेमाणे
कलावंत – रितेश देशमुख, राधिका आपटे, तन्वी आझमी, उदय टिकेकर, शरद केळकर, अदिती पोहनकर, संजय खापरे, अमिता खोपकर व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा