बॉलीवूडमध्ये गुन्हेगारीचा नि:पात करणारे निडर पोलीस अधिकारी अगदी फिल्मी पद्धतीने अनेक चित्रपटांमध्ये दाखविण्यात आले आहेत. अलीकडे ‘अ‍ॅण्टिहीरो’ ही संकल्पना प्रेक्षकांना अधिक रुचते असेही दिसून आले असले तरी बाजीराव सिंघमसारखे नायक लोकांना आवडतात. गुन्हेगारांशी दोन हात करणारा नायकऐवजी नायिका दाखविण्याचा वेगळा प्रयत्न यशराज फिल्म्सने ‘मर्दानी’ या चित्रपटातून केला असून राणी मुखर्जीने साकारलेली मर्दानी अफलातून आणि तडफदार आहे. लहान मुलींना पळवून नेऊन त्यांचा शरीरविक्रयासाठी वापर करणाऱ्या भयंकर धंदा कसा चालतो यावर अंगावर काटा आणेल असा प्रकाशझोत या चित्रपटाने टाकला असून त्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत.
शिवानी शिवाजी रॉय ही मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागातील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले घर सांभाळून इमानेइतबारे पोलीसची डय़ुटी करते. तिच्या भाचीची एक अनाथालयात राहणारी मैत्रीण प्यारी ही १२-१३ वर्षांची मुलगी अचानक गायब होते. तिचा थांगपत्ता शोधण्यासाठी इन्स्पेक्टर शिवानी कसोशीने प्रयत्न करते तेव्हा ती शोध घेत घेत कोवळ्या मुलींचा व्यापार करून त्यांना शरीरविक्रय करायला भाग पाडणारी टोळी आणि अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या भयंकर टोळीपर्यंत पोहोचते. या टोळीचा म्होरक्या वॉल्टला शोधून त्याचा बीमोड करण्याचे शिवानी ठरविते.
अतिशय थेट विषयाला हात घालणारी बंदिस्त पटकथा मांडताना दिग्दर्शकाने फिल्मी अतिरंजितपणाला पूर्ण फाटा देत चित्रपट केला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटापर्यंत चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात पूर्ण यशस्वी ठरतो. पोलिसांचे कौटुंबिक जीवन, त्यांचे ताणतणाव, दहशतवाद्यांचा एका पोलिसाच्या नेतृत्वाखालील चमूने केलेला पाडाव, अंडरवर्ल्डशी दोन हात करणारा पोलीस नायक यासारख्या विषयांवर सातत्याने चित्रपट येत आहेत, येऊन गेले आहेत. बॉलीवूडमधला हमखास यशाचा फॉम्र्युला असलेला पोलीस-गुन्हेगार-राजकीय नेते यांची हातमिळवणी वगैरे वगैरे विषयावरील चित्रपटांची प्रेक्षकांना सवय झाली आहे. त्यात भरपूर अतिरंजित फिल्मीपणाचा कळस दाखवून शेवटी पोलीस नायक खलनायकाला नेस्तनाबूत करतो इथपर्यंत सारे काही प्रेक्षकाला पाठ असते. परंतु, सरफरोश चित्रपटातून आमिर खानने साकारलेला एसीपी राठोड आणि त्यातील पोलिसांचे वास्तववादी चित्रण यातला खरेपणा प्रेक्षकाला भिडला म्हणून आवडला. दिग्दर्शकाने ‘मर्दानी’मध्ये शिवानी शिवाजी रॉय या राणी मुखर्जीने साकारलेल्या प्रमुख भूमिकेत सुरुवातीपासूनच असे वास्तववादी चित्रण बारकाईने करण्यात आले आहे. लेखक-दिग्दर्शकाने कोवळ्या मुलींचा शरीरविक्रयासाठी आणि अमली पदार्थाची ने-आण करण्यासाठी केला जाणारा वापर हा विषय, त्यातील अमानुषपणा, दाहकता दाखविण्याच्या उद्देशाने थेट पद्धतीची मांडणी पटकथेत केली आहे. त्यामुळे प्यारी ही मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्यापासून ते अंतिम खलनायकापर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक दृश्याकडे प्रेक्षक  टक लावून पाहत राहतो. पोलिसांची भाषा, त्यांच्यावर येणारे दबाव हे सगळे छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून दाखवत खलनायकाची क्रूरता दाखवण्यासाठी केलेल्या प्रसंगाची योजना हे सारे वास्तववादी वाटते, त्यामुळेच प्रेक्षकाला पटते, मनाला भिडते.
राणी मुखर्जीने साकारलेली शिवानी रॉय अप्रतिम आहे. भूमिकेचा तिने केलेला विचार आणि त्यासाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. तिच्याबरोबरच अन्य सर्व कलाकार नवखे असावेत. परंतु, वॉल्ट ऊर्फ करण हा खलनायक साकारणाऱ्या ताहीर भसीननेही अभिनयात नवीन असलो तरी आपण कच्चे नाही हे दाखवून दिले आहे. चित्रपटाच्या विषयापासून प्रेक्षक दूर जाऊ नये म्हणून एकही गाणे, किंवा शिवानी रॉयचा प्रियकर, नवरा व त्यांचे एकत्रित आयुष्य यावर अजिबात भर दिग्दर्शकाने दिलेला नाही. बॉलीवूडची नेहमीची फिल्मीगिरी टाळण्याचा चांगला प्रयत्न केला असून त्यासाठी दिग्दर्शकाला निर्मात्याने साथ दिली ही बाब बॉलीवूडच्या निव्वळ गल्लापेटीकडे लक्ष ठेवून चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवी.
मर्दानी
निर्माता – आदित्य चोप्रा
दिग्दर्शक – प्रदीप सरकार
लेखक – गोपी पुथरन
छायालेखक – ऑर्टर झुरावस्की
संकलन – संजीब दत्ता
संगीत – शंतनू मोईत्रा
कलावंत – राणी मुखर्जी, जिशू सेनगुप्ता, ताहीर भसीन, अनिल जॉर्ज, संजय तनेजा, प्रियंका शर्मा, विक्रांत कौल, मिखाइल यावलकर, अखिलेश वर्मा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा