मित्र आणि त्यांच्यामध्ये असणारे धम्माल नाते तसे शब्दांमध्ये सांगण्याच्या पलीकडचेच असते. या मैत्रीच्या नात्यातील आणखी एक पण तितकाच महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रेम. प्रेम प्रत्येकालाच होते. प्रेमाची परिभाषा का काय ते म्हणतात ना ती नसली तरीही या प्रेमाच्या या वळणवाटांवर प्रत्येकजण एकदातरी भरकटतोच. मग भरकटत भरकटत तो कुठवर जातो याचा अंदाज बाधणंही कठीणच. हाच अंदाज बांधत आणि पहिल्या प्रेमाच्या गाठोड्यातून आठवणींचा खजिना बाहेर काढत दिग्दर्शक सतीश राजवाडे घेऊन आले आहेत चित्रपट ‘ती सध्या काय करते’. सतीश राजवाडे यांच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच एक उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्रमंडळींच्या ‘गेट टू गेदर’च्या निमित्ताने एक ग्रुप भेटतो. बऱ्याच वर्षांनंतर मित्रांच्या गप्पा रंगात आल्यावर जो काही कल्ला होतो तो याही चित्रपटात दाखविण्यात आला आहे. म्हणजे अगदी एकमेकांच्या सवयींपासून ते पहिल्या क्रशबद्दल…..पहिलं क्रश…गप्पांच्या आणि आठवणींच्या मैफिलीमध्ये नकळतपणे समोर येणारा एक चेहरा पुन्हा एकदा आपल्याला बॅकफूटवर नेऊन ठेवतो आणि मग प्रवास सुरु होतो आठवणींचा, प्रेमाचा, साशंकतेचा, मनात माजलेल्या काहुराचा आणि निखळ मैत्रीचा. अनुराग आणि तन्वीच्या सुरेख प्रवासाभोवती या चित्रपचटाचे कथानक फिरत असले तरीही त्या दोघांव्यतिरिक्त इतर पात्रंही लक्ष वेधत आहेत. चित्रपट, प्रेम आणि एकंदर शालेय वर्षांमध्ये असताना वाढीला लागलेल्या शरीरासोबतच वाढीला लागलेल्या मेंदूतील अफलातून विचार दिग्दर्शकांनी सुरेखपणे मांडले आहेत. पडद्यावर छोटा अनुराग पाहताना खरंच त्याच्याइतक्या वयाच्या मुलाला कोणा एका मुलीकडे पाहून न उमगलेल्या प्रेमाच्या भावनेचा भास होऊ शकतो का? हाच प्रश्न राहून राहून पडतो आणि चित्रपटाच्या पुढे सरकणाऱ्या कथानकासोबतच या प्रश्नाचे उत्तरही मिळून जाते. चित्रपटात बालपणातील भागामध्ये आणि तारुण्यावस्थेमध्ये पडद्यावर सुरु असणारे डायलॉग्स आणि कलाकारांच्या ओठांच्या हालचाली काही दृश्यांमध्ये हलक्याश्या मागेपुढे वाटतात.

बालपणापासून मनाच्या कोपऱ्यात घर करुन बसलेली ‘ती’ महाविद्यालयीन दिवसांमध्ये एक चांगली मैत्रीण बनते. किंबहुना ‘ती’चं महत्त्व मैत्रिणीपेक्षाही जास्त असतं. पण, मग प्रेमाच्या या प्रवासात अडथळे आलेच नाहीत तर त्या प्रेमाची मजा काय? अभिनव आणि तन्वीमध्येही असेच काहीसे अडथळे येतात. अर्थात ते अडथळे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. पहिलं प्रेम, त्यानंतर ते व्यक्त करण्यासाठी केलेली अयशस्वी धडपड, त्या धडपडीमध्ये गेलेला वेळ आणि शेवटी काहीही न सांगता बोलता दुरावलेल्या नात्याची रुखरुख अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकरने त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटात सुरेखपणे मांडली आहे. अभिनय आणि आर्या म्हणजेच चित्रपटातील अनुराग आणि तन्वी मोठे होतात खरे पण, दोघांच्याही मनात साठलेल्या भावना आणि इतक्या वर्षांच्या दुराव्यामुळे नात्यात आलेला काहीसा संकोचलेपणा मांडताना दिग्दर्शकांनी काही बारकावे अचूकपणे टिपले आहेत. या अनुभवांमध्ये तुम्ही स्वत:लाही शोधू शकता. कारण, पहिल्या प्रेमाचा, तुमच्या क्रशला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी काहीतरी शकला लढवणारा अनुराग पाहिला की आपणही कधीच्या काळी असे काहीतरी केले होते, याची नकळत आठवण होते. याच आठवणीतून ‘ती’ किंवा ‘तो’ सुद्धा आपल्याला पुसटसा दिसू लागतो.

मैत्री आणि पहिलं प्रेम काहीही केलं तरीही विसरता येत नाही आणि ते आपल्यापासून दुरावत तर नाहीच नाही. त्यामुळे प्रेमाच्या या प्रवासाची मैत्रीपूर्ण सांगता करत सतीश राजवाडे यांनी अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्यामार्फत एक सरळ, साधी आणि सोपी अशी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘ती सध्या काय करते’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनुराग आणि तन्वीची ‘प्रेमळ मैत्री’ एक नवी सुरुवात ठरु शकते.

  • दिग्दर्शक- सतीश राजवाडे
  • निर्मार्ते- निखिल साने (झी स्टुडिओज), पल्लवी राजवाडे (असंख्य प्रॉडक्शन)
  • कलाकार- अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, हृदित्य राजवाडे, निर्मोही अग्निहोत्री, तुषार दळवी, अनुराधा राज्याध्यक्ष, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, उर्मिला कानेटकर-कोठारे

 

सायली पाटील
ट्विटर- @sayalipatil910
sayali.patil@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review of marathi movie ti sadhya kay karte