तरुण कलावंत मंडळीची फळी आहे म्हटल्यावर चांगली दमदार मारधाड चित्रपटात पाहायला मिळणार असे प्रेक्षकांना वाटते. परंतु चांगले कलावंत, उत्तम छायालेखन असे सगळे असले तरी तर्कविसंगत गोष्ट आणि त्या गोष्टीची तितकीच तर्कविसंगत मांडणी यामुळे ‘संघर्ष’ हा चित्रपट पाहणे हास्यास्पद ठरते.
भाऊ, मन्या, टवळ्या आणि त्यांची गुणाजी चाळ गुण्यागोविंदाने सारे काही चाललेले असते. कराटे चॅम्पियन भाऊ, नर्तक मन्या आणि रिकामटेकडा टवळ्या यांची घट्ट मैत्री आहे. गुरवकाका चाळ कमिटीचे अध्यक्ष आहेत. चाळीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून स्थानिक गुंड ऊर्फ बिल्डर ऊर्फ राजकारणी असलेल्या रघुभाईकडून पैशांची मदत घेऊन दणक्यात गणपती सण साजरा केला जातो. मुंबईतली चाळ असल्यामुळे ती बळकावून पाडायची आणि त्या जागी टोलेजंग इमारत उभारून पैसा कमावण्याचा रघुभाईचा डाव असतो. त्यातच रघुभाईच्या गुंडांबरोबर भाऊ-मन्या-टवळ्या यांचे वैर होते आणि मग रघुभाई पोलीस, राजकारणी यांच्या मदतीने कट रचतो. भाऊ-मन्या-टवळ्या यांच्याविरुद्धचा कट ते तिघे उधळून लावतात.
साधी, सरळ, सोपी गोष्ट आणि वेगवेगळ्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे चांगले कलावंत असूनही लेखक-दिग्दर्शकांनी पटकथा लेखन, व्यक्तिरेखांचे लेखन यातल्या ढिसाळपणामुळे आणि तर्कविसंगत मांडणीमुळे चित्रपट प्रभावहीन आणि कित्येक ठिकाणी हास्यास्पद ठरतो. कथानकाचा एकसंध अनुभव देऊ शकत नाही. राजेश श्रुंगारपुरे, नकुल घाणेकर, अंशुमन विचारे, अरुण नलावडे, प्राजक्ता माळी, सुशांत शेलार अशी कलावंतांची फळी असूनही त्याचा चांगला वापर दिग्दर्शकांना करता आलेला नाही.
सुशांत शेलारने साकारलेला खलनायक अतिशय हास्यास्पद ठरतो. ७०-८० च्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या कथनशैलीची नक्कल करण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. गोष्ट प्रेक्षकांना माहीत असलेलीच दाखवायला हरकत काहीच नाही. परंतु त्यातील भाऊ ही व्यक्तिरेखा सोडली तर अन्य कुठल्याच व्यक्तिरेखांना काहीच आगापिछा नाही. सर्वसामान्यांचा गुंड-राजकारणी यांच्याशी संघर्ष असे सरधोपट स्वरूप असूनही दिग्दर्शकांनी मांडणीमध्ये गोंधळ घातला आहे. चाळीत एक पोलीस अधिकारी राहात असताना संकटप्रसंगी चाळीतील माणसे त्याची मदत घेत नाहीत. रघुभाई हा खलनायक आणि त्याचे गुंड यांचा भाऊच्या पत्रकार प्रेयसीच्या संपादकाच्या खुनाशी संबंध जोडून लेखकाने गोंधळ घातला आहे. भाऊच्या प्रेयसीचे काका पोलीस आयुक्त असताना पोलीस-राजकारणी भाऊ-मन्या-टवळ्याला कट रचून अडकवतात तरी ते काहीच करू शकत नाहीत अशा अनेक गोष्टी खटकतात. कर्णकर्कश संगीत आणि तर्कविसंगत दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट निव्वळ हास्यास्पद ठरतो.
संघर्ष
निर्माता : विज्ञान सिद्धी फिल्म्स लि.
कथा, प्रमुख दिग्दर्शक – साईस्पर्श.
पटकथा-संवाद-कार्यकारी दिग्दर्शक – आर. विराज.
छायालेखक – सॅण्डी.
संगीत – निशिकांत सदाफुले, वापी-तुतूल.
कलावंत – राजेश श्रुंगारपुरे, संगीता कापुरे, प्राजक्ता माळी, नकुल घाणेकर, अंशुमन विचारे, माधवी निमकर, देवदत्त नागे, अरुण नलावडे, अमिता खोपकर, सुशांत शेलार, विलास उजवणे, अजय पूरकर, सुलभा आर्य, पंकज खामकर, राजेश कांबळे, नीलेश सूर्यवंशी, सुधीर पेडणेकर.