मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच रहस्यमय किंवा थरारपट प्रकारातील चित्रपट पाहायला मिळतात. रहस्यमय, किंवा थरारपट हा प्रकारच प्रेक्षकांना रिझवणारा असा प्रकार आहे. हत्येची घटना, त्यामागील हेतू, हत्या करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढणे वगैरे चित्रपटातून पाहायला मिळते. हिंदीत अनेक रहस्यमय चित्रपट गाजले आहेत. ‘७०२ दीक्षित्स’ हा या बऱ्याच कालावधीनंतर आलेला रहस्यपट आहे. कलावंतांचा चांगला अभिनय हेच प्रामुख्याने सामथ्र्य ठरले आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अतिशय मर्यादित अर्थाने चित्रपट यशस्वी ठरला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे एकदम सरळसोट घटना हेच म्हणावे लागेल. एका रहिवासी सोसायटीतील सातव्या मजल्यावरील ७०२ क्रमांकाच्या सदनिकेत यश-काव्या-रेवा दीक्षित हे कुटुंब राहत असते. त्यांच्याकडे काम करणारी आशा नावाची तरुणी अचानक एक दिवशी बाल्कनीतून खाली पडते आणि मरण पावते. त्या वेळी यश दीक्षित घरातच असतो. पर्यायाने पोलीस त्याला चौकशीसाठी पकडून नेतात आणि सरळ तुरुंगात डांबतात. यशला सोडविण्यासाठी त्याची बायको काव्या आपली मैत्रीण रिया पंडितला बोलावते आणि दोघी मिळून यशला या खटल्यातून निदरेष सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.
एक सरळसाधी मृत्यूची घटना ही खरी आत्महत्येची घटना आहे की हत्येची घटना आहे याभोवती चित्रपट फिरतो. मात्र हे दाखवत असताना दिग्दर्शकाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी केलेल्या नाहीत. पोलीस यश दीक्षितला पकडून नेतात हे संयुक्तिक असले आणि पहिल्यांदा त्याच्यावरच संशय घेतात हेही मान्य केले तरी पोलीस तेवढय़ावरूनच त्याला दोषी मानतात आणि त्यादृष्टीनेच प्रयत्न करतात हे खचितच पटणारे नाही. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे रिया आणि यश हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रिण असून रियाचे यशवर प्रेम होते. परंतु, यशचे काव्यावर प्रेम असल्यामुळे त्या दोघांचे लग्न झाले. त्यामुळे हा एक धागा रिया यशला वाचविण्यासाठी त्याचा खटला लढण्याचा निर्णय घेते त्यामागे आहे असे दिग्दर्शकाने दाखविले आहे.
यश-काव्या यांचे नाते, त्यांची लहान मुलगी रेवा, यश-काव्याचे मित्रमैत्रीणी, नातेवाईक यांच्याशी असलेले नाते, एवढेच काय ज्या आशा नामक मोलकरणीचा मृत्यू होतो तिचे या कुटुंबाशी जुळलेले घनिष्ठ नाते असे कथानक अधिक गहिरे करण्यासाठी आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी दिग्दर्शकाने अजिबात दाखविलेल्या नाहीत. एक-दोन प्रसंगात आशा दीक्षित कुटुंबात काम करण्यासाठी म्हणून येते. आशा आणि रेवाचा एखादा प्रसंग एवढेच दाखवून आशा दीक्षित कुटुंबात रमली आहे, रेवाला आशाचा लळा लागला आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो प्रभावी नाही. कथानक रंगतदार करण्यासाठी आवश्यक असे प्रसंग न दाखविताच थेट आशाचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू होतो हे दाखविले आहे. पोलिसांना एका व्यक्तीचा मृत्यू ही हत्या होती की आत्महत्या हे शोधून काढता येत नाही किंवा पोलिसांना तसे करायचे नाही हे चित्रपटात अधोरेखित केले आहे. एका सरळ घटनेचा तपशील पडद्यावर दिसत राहतो. रिया पंडितच्या भूमिकेतील पल्लवी पाटील, यशच्या भूमिकेतील विजय आंदळकर आणि काव्याच्या भूमिकेतील गौरी निगुडकर यांनी बऱ्यापैकी अभिनय केला आहे ही जमेची बाजू. आशाच्या मृत्यूला जबाबदार कोण एवढेच रहस्य उरते. त्यामुळे प्रेक्षकाला एका सरळ रेषेतील कथानक पाहणे फारसे खिळवून ठेवणारे वाटतच नाही. परिणामी रहस्यमय असला तरी चित्रपट फिका ठरतो.
७०२ दीक्षित्स
निर्माते – रोहित जाईल, प्रशांत उंब्राणी
कलात्मक निर्माता – जमशिद रूईन्टन
संकलक – दिग्दर्शक – शंख राजाध्यक्ष
कथा – रोहित जाईल
पटकथा – ऋतुराज धलगडे
संवाद – ऋषिकेश कोळी
कलावंत – विजय आंदळकर, गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, जयवंत वाडकर, उमेश धूत नांदेडकर, श्रीरंग देशमुख, स्नेहा चव्हाण, विक्रम गोखले, अनुश्री जुन्नरकर, रुची जाईल, जगदीश ढलपे, राहुल कुलकर्णी व अन्य.