संजय लीला भन्साळींचा चित्रपट आहे हे ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या पहिल्या चित्रचौकटीपासूनच समजते. भरजरी कपडेपट, दागदागिने आणि भव्यतेचा सोस आणि बेगडी कलात्मकता या नावाखाली इतिहासाचा विपर्यास करीत सादर केलेला हा चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी खटकल्यावाचून राहत नाही. उरतो तो केवळ अतिभव्य, रंगीबेरंगी भरजरी कपडेपटांचा नुसताच झगझगाट. रणवीर सिंग बाजीराव या प्रमुख भूमिकेला अजिबात न्याय देऊ शकलेला नाही. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

संगीत, गाणी, नृत्य, भरजरी वेशभूषा आणि भव्यतेचा सोस म्हणजे भन्साळींचा चित्रपट हे समीकरण आणखी पक्के करणारा भन्साळींचा हा चित्रपट ठरतो. प्राचीन काळातील लढाई दाखविण्याचा इंग्रजी चित्रपटातील प्रयत्न, त्याला भव्यतेची जोड आणि त्यांच्याकडील ‘कॉस्च्युम ड्रामा’सारखी मांडणी आणि रचना दिग्दर्शकाने केल्याचे हा चित्रपट पाहताना जाणवते. त्यामुळे अस्सलतेचा अभाव अनेक ठिकाणी दिसतो. साध्या साध्या गोष्टी-प्रसंगांमधूनही तो दिसत राहतो, म्हणून खटकतो.

बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई एखाद्या सर्वसामान्य स्त्रीसारखी शनिवारवाडय़ात वावरणे, लढाई जिंकून आल्यानंतर बाजीराव पेशव्यांना ओवाळण्यासाठी येत असताना अनेक जणींमधून कशीबशी वाट काढत काशीबाई येते असे प्रसंग खटकतात. मस्तानी आणि काशीबाई या दोघीही जवळपास एकाच वेळी मुलाला जन्म देतात असे दाखविले आहे. नानासाहेब हा काशीबाईंचा मुलगा सतरा-अठरा वर्षांचा होतो आणि त्याच्याकडे पेशवेपदाचे अधिकारही दिले जातात; परंतु चित्रपटाच्या शेवटापर्यंत मस्तानीचा मुलगा मात्र लहानगा म्हणजे अगदी दोन-तीन वर्षांचाच राहतो हे कसे काय हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

बाजीराव, मस्तानी आणि काशीबाई या तीन प्रमुख व्यक्तिरेखांमधला संघर्ष, काशीबाई-मस्तानी यांच्यावर चित्रित केलेले प्रसंग चांगले झाले आहेत. एकूण चित्रपट भरजरी, भव्य दाखविण्यासाठी छायालेखकाची करामत नक्कीच आहे. मात्र कथासूत्राची चुकीची मांडणी, बाजीराव या ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे कर्तृत्व आणि महत्ता दाखवून उत्तम ऐतिहासिक चित्रपट सादर करण्याची चांगली संधी विश्वासार्हता आणि अस्सलपणाच्या अभावी दिग्दर्शकाने वाया दवडली आहे असेच म्हणावे लागेल.

पेशव्यांच्या शनिवारवाडय़ातील दरबार, छत्रपती शाहू यांचा दरबार, वेशभूषा, सादरीकरण यांमध्ये राजस्थानी बाज असल्याचे चित्रपट पाहताना जाणवते. त्यामुळेही चित्रपट खटकतो. उरतो तो केवळ नुसताच झगझगाट.

बाजीराव मस्तानी

निर्माता-दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी

पटकथा – संवाद – प्रकाश कपाडिया

छायालेखक – सुदीप चटर्जी

संगीतकार – संचित बल्हारा, संजय लीला भन्साळी

साहाय्यक संगीतकार – श्रेयस पुराणिक

संकलक – राजेश पांडे

वेशभूषा  – मॅक्झिमा बासू, अंजू मोदी

कलावंत – रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, मिलिंद सोमण, वैभव तत्त्ववादी, तन्वी आझमी, अनुजा गोखले, आदित्य पांचोली, महेश मांजरेकर, सुखदा खांडेकर, गणेश यादव व अन्य.

सुनील नांदगावकर

sunil.nandgaokar@expressindia.com

Story img Loader