रोहित शेट्टीचा चित्रपट पाहतोय अशी खूणगाठ बांधली की मसाला मनोरंजन हमखास पडद्यावर दिसणार हे ओघाने आलेच. शाहरूख खान ब्रॅण्डचा ‘दिलवाले’ हा चित्रपट बिनडोक मसाला करमणूक निश्चितच करणारा आहे. जुन्या हिंदी सिनेमातील आणि शाहरूखच्या आधीच्या चित्रपटातील फॉम्र्यूलाचा पुरेपूर वापर करीत, नवं काहीही न देणारा हा सिनेमा विनोदाची फोडणी देत किमान टाइमपास करमणूक करण्यात यशस्वी झाला आहे. मात्र अनावश्यक प्रसंगांना कात्री लावून चित्रपटाची लांबी थोडी कमी केली असती तर बरे असे १५४ मिनिटांचा हा लांबलचक सिनेमा पाहताना प्रेक्षकांना वाटत राहते हेही खरे.

परदेशातील चकाचक चित्रीकरणस्थळे, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सच्या आलिशान गाडय़ा आणि व्हिण्टेज गाडय़ा, खलनायकांनी नायकाचा परदेशातील रस्त्यांवरून चकाचक गाडय़ांमधून केलेला पाठलाग, भरपूर गाणी, जॉनी लिव्हर, वरूण शर्मा, बोमन इराणी आणि संजय मिश्रा यांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून वरचेवर विनोदी स्कीट्स, गाडय़ांची नासधूस, थोडीशी हाणामारी, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज अशा सगळ्या अपेक्षित गोष्टींची खिचडी म्हणजे रोहित शेट्टीचा सिनेमा.

टीव्हीवरच्या स्टॅण्डअप कॉमेडी प्रकारातला विनोद, फिल्मीगिरीच्या प्रसंगांची रेलचेल असलेला हा चित्रपट आहे. शाहरूख खान-काजोल जोडी आवडणाऱ्या प्रेक्षकांना पडद्यावरील या जोडीचे या चित्रपटातील दर्शन कदाचित आवडणार नाही.  कारण ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’सारखे त्यांचे प्रेम पडद्यावर अवतरते.

वर्तमानकाळात शाहरूख खान एक कार डिझायनर दाखविला आहे. वीर या व्यक्तिरेखेतील वरूण धवन हा त्याचा लहान भाऊ आहे जो शाहरूखचा खूप लाडका वगैरे तद्दन फिल्मी प्रकार दाखविण्यात आला आहे. राज म्हणजे शाहरूखचे आधीपासूनचे मित्र आणि सहकारी म्हणून मुकेश तिवारी, पंकज त्रिपाठी अखंड चित्रपटात शाहरूखबरोबर आहेत. मुकेश तिवारीचा धाकटा भाऊ असल्यामुळे सिद्धू हा वीरचा खास मित्र आहे. वीरचे ईशितावर प्रेम जडते. मात्र ईशिताची मोठी बहीण मीरा म्हणजेच काजोल आहे. मीराचा वीर-ईशिताच्या लग्नाला विरोध आहे. याचे कारण राज-मीराच्या पूर्वीच्या संबंधांमध्ये दडलेले आहे असे म्हणत फ्लॅशबॅकमध्ये शाहरूख-काजोलचे प्रेमसंबंध, त्यांच्यातील तणाव, त्याची कारणे, शाहरूखचे पूर्वायुष्य अशा सगळा गोष्टींची गुंफण, त्याला विनोदी खलनायकाचा तडका अशी सगळी खिचडी दिग्दर्शकाने सादर केली आहे.

शाहरूख खान ब्रॅण्डचा चित्रपट म्हटल्यावर तो भाव खाऊन जाणार हे ओघाने आलेच. त्याचबरोबर काजोलनेही व्यक्तिरेखेच्या निरनिराळ्या छटांचा तोडीस तोड अभिनय केला आहे. वरूण धवनला शाहरूखबरोबर काम करण्याची संधी मिळाली असून त्यानेही आपली भूमिका चांगली वठवली आहे. वरूण शर्मा, संजय मिश्रा, जॉनी लिव्हर यांच्या विनोदी व्यक्तिरेखांमुळे चित्रपट अधिक सुसह्य़ ठरतो हे नक्की. तद्दन फिल्मीगिरी दाखवत रोहित शेट्टीने एकप्रकारे जुन्या पठडीबद्ध हिंदी सिनेमाच्या फॉम्र्यूलाचा पुरेपूर वापर करीत नवीन काहीही न देता प्रेक्षकांचा निव्वळ टाइमपास असा चित्रपट केला आहे.

दिलवाले

निर्माती – गौरी खान

दिग्दर्शक – रोहित शेट्टी

लेखक – युनूस सजावल

संवाद – साजिद-फरहाद

संगीत – प्रीतम चक्रवर्ती

छायालेखक – डय़ूडली

संकलक – बंटी नागी

कलावंत – शाहरूख खान, काजोल, वरूण धवन, कीर्ती सनोन, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, वरूण शर्मा, चेतना पांडे, विनोद खन्ना, मुकेश तिवारी, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, कबीर बेदी, नवाब शहा, शावर अली.

सुनील नांदगावकर

sunil.nandgaokar@expressindia.com

Story img Loader