सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेत्यांच्या कोलांटउडय़ा रोज टीव्हीवरून लोकांना पाहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दिग्गज नेते प्रचारसभांमधून झाडत आहेत, ते पाहून लोकांची चांगलीच करमणूक होते आहे. हाच अनुभव ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळेल. दोन इरसाल राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात काय काय करतात ते दाखवितानाच हायकमांड, पक्षाच्या अव्वल नेत्यांची हुजरेगिरी, नेते उत्तम अभिनेते असतात याची मासलेवाईक उदाहरणे या अवतीभवती दिसणाऱ्या राजकीय परिस्थितीवरचे चुरचुरीत भाष्य प्रामुख्याने लेखकाने केले आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग असून लेखक-कलावंत, संगीत, छायालेखन, दिग्दर्शन अशी सगळी भट्टी चांगली जमून आल्याने दोन इरसाल राजकारण्यांची जुगलबंदी पाहताना हमखास हशा-टाळ्या न पिकतील तरच नवल असा हा चित्रपट आहे.
कोळसेवाडी या आडगावाचा आमदार नारायण वाघ आणि आधी गावचा सरपंच असलेला व आता वाघ यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेवर आमदार बनलेला विश्वासराव टोपे या दोघांची एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नाना तऱ्हा हा चित्रपटाचा विषय आहे. गावात आपलीच प्रतिष्ठा राहावी आणि राजकीय वजन प्रस्थापित व्हावे आणि प्रतिस्पध्र्याला कायम धूळ चारता यावी या एकाच उद्देशाने पछाडलेले वाघ आणि टोपे यांच्यातील वैर आमदार झाल्यावरही कायम राहते. आपल्याला पद नाही मिळाले तरी चालेल; परंतु आपल्या वैऱ्याला मात्र नक्कीच मिळू नये यासाठी वाट्टेल ती तजवीज करण्याची मानसिकता या दोन्ही आमदारांच्या व्यक्तिरेखांमधून लेखक-दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने रंगविली आहे.
संविधान म्हणजेच राज्यघटना हेही माहीत नसलेले अल्पशिक्षित राजकारणी, स्वत:ला पुस्तक वाचून अभ्यास करता येत नसल्यामुळे स्वीय साहाय्यकाला अभ्यास करून टिपण काढून मग त्याच्याकडून स्वत: समजावून घेऊन त्याने लिहून दिलेले पाठ करून बोलणे एवढेच ठाऊक असलेला राजकारणी विश्वासराव टोपे सयाजी शिंदे यांनी झकास रंगविला आहे. त्याला तोडीस तोड आणि चलाख असलेला क्लृप्तीबाज राजकारणी नारायण वाघ मकरंद अनासपुरे यांनी लाजवाब रंगविला आहे. दोन व्यक्तिरेखांची एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी केलेली जुगलबंदी आणि त्या व्यक्तिरेखा साकारताना सयाजी शिंदे-मकरंद अनासपुरे यांची अभिनय जुगलबंदी या समांतर गोष्टी प्रकर्षांने लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत.
भूखंड लाटणारे, हायकमांडपुढे वाट्टेल तेवढी मान तुकविणारे, हुजरेगिरी करताना पट्टेवाल्यालाही लाजविणारे आणि सरकारी योजनेमध्ये स्वत:ची धन करण्यासाठी नाना क्लृप्ती लढविणारे असे राजकारणात वरचढ ठरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ‘गुण’ उधळणारे राजकारणी प्रमुख दोन व्यक्तिरेखांमधून दाखविताना लेखकाने चुरचुरीत संवाद, प्रसंगांची पखरण करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ही धमाल हसवणूक पाहतानाच प्रेक्षकाला वास्तवातील राजकारणी मंडळींचे वागणे-बोलणे, त्यांच्या उचापत्या, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावरील बातम्या, प्रकरणात अडकल्यानंतर टीव्हीवरून दिसणारे वास्तवातील राजकारण्यांचे चेहरे याची नकळतपणे आठवण झाल्यावाचून राहणार नाही. टोपे यांचा स्वीय साहाय्यक बनलेला सिद्धेश्वर झाडबुके आणि वाघ यांचा स्वीय साहाय्यक बनलेला विनीत भोंडे यांनी स्वीय साहाय्यक ऊर्फ हुजऱ्या ऊर्फ स्तुतिपाठक या व्यक्तिरेखाही चांगल्या साकारल्या असून त्यामुळे अनेक प्रसंग गमतीदार बनले आहेत.
गावात आपले वर्चस्व सिद्ध करून लोकांना आणि मुख्यत्वे विश्वासराव टोपे यांना भूलविता येईल या उद्देशाने आमदार नारायण वाघ गाजलेली पोर्नस्टार सेरेना हिला कोळसेवाडीत सेरेनादीदी नामक विभूतीच्या रूपात घेऊन येतो आणि अख्खा गाव ‘जिथे कोणी फिरेना तिथे आली सेरेना’ म्हणत तिच्या नामाचा जप करीत सुटतात. ही सेरेनादीदी दाखवून लोक भोंदूबाबा-बुवा-दीदी यांच्यामागे कसे भोळसटपणे लागू शकतात याचीच झलक दाखविली आहे. हायकमांडच्या नातवाचा चेंडू शोधून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळे जण भाटगिरी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतात या छोटय़ाशा प्रसंगातून लेखक-दिग्दर्शकाने आपल्याकडच्या राजकारणाचा खेळखंडोबा कसा झाला आहे याचे मार्मिक दर्शन घडविले आहे.
धमाल हसवणूक, पण नकळतपणे चुरचुरीत संवादातून आजच्या राजकारण्यांवर, परिस्थितीवर भाष्य करणारे खुमासदार पटकथा-संवाद यामुळे खरे तर लेखक हाच चित्रपटाचा एक प्रकारे नायक म्हणायला हवा. दोन्ही अस्सल कलावंतांची उत्तम साथ अशी भट्टी जमल्यामुळे चित्रपट धमाल उडवून देतो.
पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा
निर्माता – नवीन सिंग, राकेश आर. भोसले
दिग्दर्शक – बाळकृष्ण शिंदे
लेखक – अरविंद जगताप
छायालेखक – सुरेश सुवर्णा
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
कलावंत – मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, सिद्धेश्वर झाडबुके, विनीत भोंडे, डॉ. विलास उजवणे, मेंडेलीना अलेक्झांड्रा, आलोकनाथ, पूर्णिमा अहिरे, स्वप्निल राजशेखर, रसिका वझे, ज्योती जोशी, शरद शेलार, विनोद खेडकर, उज्ज्वला गोड, आशीष विद्यार्थी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा