जरी काळ बदलत असला, तरी प्रेमाची संकल्पना काही बदलत नाही. इतिहासात अनेक प्रेमकथा होऊन गेल्या. त्यातील काही कथा आजही सांगितल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे रमा आणि माधव. ‘रमा माधव’ यांच्या प्रेमाला अल्पायुष्य मिळालं, तरी ते पूर्णत्वाला गेलं. ‘रमा माधव’ म्हटलं की कित्येक वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांनी ‘स्वामी’ मालिकेत साकारलेल्या भूमिकांचे स्मरण होतं. यावरचं आधारित असलेल्या ‘रमा माधव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णीने केलं आहे. मराठीत शिवरायांवर अनेक चित्रपट बनवले गेले. पण पेशव्यांची कथा सांगणारा हा पहिलाचं चित्रपट. खूप दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपट म्हणून चर्चेत असलेला ‘रमा माधव’ शुक्रवारी प्रदर्शित झाला.
त्या काळी लहान वयातचं लग्न लावली जातं. अवघ्या १२ वर्षांची रमा तिच्या सासुरवाडीला म्हणजेच शनिवारवाड्यात पाऊल ठेवते. अगदी सामान्य घरातून आलेली छोटी रमा पेशव्यांच्या भव्य वाड्यात रमते. तिथे तिला साथ मिळते ती पती माधव यांची. माधवराव एक कर्तबगार पेशवा. याच दरम्यान पानिपतचे युद्ध होते. यात माधवरावांच्या थोरल्या बंधूंचे निधन होते. तरुण मुलाच्या निधनाने वडील नानासाहेब पेशवे आपला प्राण सोडतात. त्यानंतर पेशव्यांच्या गादीवर कोण बसणार यासाठी चढाओढ सुरु होते. सत्तेचे राजकारण हे इतिहासापासूनच चालत आले आहे, याची प्रचिती इथे पुरेपुर येते. नानासाहेबांचे लहान बंधू राघोबादादा यांना आधीपासूनच गादीची ओढ असते. पण श्रीमंत पेशवा होण्याचा मान मिळतो तो मात्र माधवराव पेशवे यांना. जसंजसं वय वाढतं तसं रमा आणि माधवचं प्रेमही बहरु लागतं. मात्र, या प्रेमाचं आयुष्य फार कमी होते. माधवरावांना तरुण वयातचं झालेल्या आतड्यांच्या आजारामुळे वयाच्या जेमतेम २८व्या वर्षी रमाला वैधव्य येतं आणि ती सती जाते.
अडीच तासांच्या चित्रपटात इतिहास उलगडणं म्हणजे तसं पाहायला गेलं तर कठीणचं. त्यातून पेशव्यांच्या इतिहास हा तर किती तरी मोठा. त्यामुळे मृणाल कुलकर्णीनं शिवधनुष्यचं पेललं आहे, असं म्हणायला हवं. चित्रपटात दहापेक्षाही अधिक पात्र आहेत. राघोबादादा, आंनंदीबाई, सदाशिवराव, पार्वतीबाई, रमाचे आई-बाबा, मंत्रिमंडळातील काही महत्त्वाच्या व्यक्ती चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. आता या सगळ्यांची संपूर्ण माहिती दाखविता येणं शक्य नाही, त्यामुळे त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्तीची ब-यापैकी माहिती देण्याचा केवळ प्रयत्नचं दिग्दर्शकाने केला. चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत तर पेशवाईतील राजकारण आणि लढाई यावरचं लक्ष्य केंद्रित करण्यात आले असून, मध्यंतरानंतर रमा माधवची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध दाखविण्यासाठी नेमक्याच लोकांचा केलेला उपयोग कटाक्षाने दिसून येतो आणि तो कुठेतरी खटकतोही. तेव्हा कुठेतरी व्हीएफक्सचा योग्य वापर न करण्यात आल्याचे जाणवते. मृणालचा ‘स्वामी’चा अनुभव कथा लिहिताना चांगलाच झाला आहे. पण, एक मालिका करणं आणि अडीच तासांत लोकांना तेच दाखविणे थोडं अशक्यचं आहे. तरीही चित्रपटात केवळ प्रेमकथेचा भरणा न करता पेशवेकालीन राजकारण आणि युद्ध यांवरही लक्ष्य केंद्रित करून एक चित्रपट करण्याच्या प्रयत्नाबाबत मृणालचं खरचं कौतुक करायला हवं. या चित्रपटात विशेष लक्ष्य जातं ते आलोक राजवाडे या नवोदित कलाकाराकडे. आलोकने माधवराव तर पर्ण पेठेने मोठ्या रमाची भूमिका केली आहे. मृणालने पर्णची निवड करताना कुठेतरी स्वतःचाच चेहरा पाहिला असावा. कारण जेव्हा पर्णला रमाबाईंच्या भूमिकेत पाहतो, त्यावेळी काही वर्षांपूर्वीची मृणाल कुलकर्णी ही अशीच होती, हे चित्रपट बघताना जाणवते. आलोकच्या बाबतीत म्हणायचं तर मराठी चित्रपटसृष्टीला एक ग्लॅमरस नाही, पण अभिनयाने परिपूर्ण असा कलाकार मिळाला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा अभिनय आपले लक्ष्य खिळवून ठेवतो. यांच्या व्यतिरिक्त रविंद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी, अमोल कोल्हे, प्रसाद ओक यांनी महत्वाच्या भूमिका पार साकारल्या आहेत. नितिन देसाईचे भव्य सेट हे नेहमीचं जमेची बाजू राहतात. यात मात्र तसं काही दिसून आलेलं नाही. जर नितिनने छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत केलेले सेट किंवा त्याचे इतर काम पाहता या चित्रपटातील त्याचे कलादिग्दर्शन अजिबात दिसून येत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या सुधीर मोघेंची श्रवणीय गीते यात आहेत. पण, त्याचवेळी ‘लूट लियो मोहे शाम सावरे’ हा अदिती राव हैदरीचा मुजरा प्रकर्षाने खटकतो. ऐतिहासिक चित्रपट आहे म्हणून त्यात मुजरा असायलाचं हवं असं नाही ना. त्यामुळे कुठेतरी गरज नसतानाही चित्रपटात मुज-याचा भरणा केला आहे, असे वाटते. एकंदरीत काय तर मृणालचा प्रयत्न अगदीच काही फसलेला नाही. परंतु, मनोरंजनाचा विचार केला तर कुठेतरी प्रेक्षकांच्या अपेक्षांपुढे हा चित्रपट कमी पडतो.  
दिग्दर्शिका-कथाः मृणाल कुलकर्णी
पटकथाः मनस्विनी लता रवींद्र
गीतेः रवींद्र मोघे, वैभव जोशी
संगीतः आनंद मोडक
कलादिग्दर्शकः नितिन चंद्रकांत देसाई
कलाकारः रविंद्र मंकणी, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, मृणाल कुलकर्णी, अमोल कोल्हे, प्रसाद ओक, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, श्रुती कार्लेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा