गूढ, काहीशा रहस्यमय पद्धतीच्या कथानकांबाबत नेहमीच सर्वाना उत्सुकता असते. परंतु एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांमुळे तिचे विचित्र वागणे अतक्र्य तरी खरे वाटत राहते. विचित्र घुसमट झालेल्या स्त्रीची त्यातून बाहेर पडण्याची धडपड, त्यासाठी तिच्या अंतर्मनात दडलेल्या सुखी संसाराचा ती आधार घेते. तिचा हा गूढ प्रवास दिग्दर्शकाने अचूक पद्धतीने ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटातून मांडलाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवून खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. तर्कसंगत पद्धतीने रहस्य, त्याची उकल आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असेही घडू शकते हे प्रेक्षकांसमोर मांडणारा हा चित्रपट आहे. सई ताम्हणकरचा अभिनय आणि तिच्या प्रतिमेला छेद देणारे रूप हे चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे.
एका पावसाळी रात्री शुभदा भांबावलेल्या स्थितीत रस्त्यावरून चालतेय. तिला कळत नाहीये आपण कुठे चाललो आहोत. त्या भेदरलेल्या अवस्थेत ती चालतेय, तिचे भान हरवलेय आणि एक गाडी तिला धडकते. अजिंक्य वर्तक आपल्या गाडीने अपघात केला या भीतीने पटकन उतरून गाडीसमोर आलेल्या शुभदाला रुग्णालयात दाखल करतो. पोलीस येतात. शुभदा शुद्धीवर आल्यानंतर आपले नाव शुभदा देवधर असे सांगते, बाकीचे तिला काही आठवत नाही. पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर तिचे राहते घर तिचे नाही असे लक्षात येते, तिचा नवरा शशी देवधरचा शोध सुरू होतो. सगळे पुरावे तिच्या विरोधात जाणारे असतात. मग शुभदाला विस्मृती झाल्याचे निदान होते आणि तिच्या नातेवाइकांचा शोध घेणारी जाहिरात दिली जाते. ती जाहिरात पाहून एक तरुण येतो. मग एकाहून एक जबरदस्त आश्चर्यकारक धक्के देत शुभदा तिच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेते. अजिंक्य वर्तक तिला मदत करतो.
मराठी चित्रपटात अशा प्रकारचे चित्तथरारक गूढ वातावरण असलेले चित्रपट फारसे आलेले नाहीत. त्यामुळे लेखक-दिग्दर्शकाने निवडलेला विषय आणि केलेली मांडणी याला दाद द्यायला हवी. सगळे काल्पनिक असले तरी एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत धक्कादायक घटना घडल्यानंतर तिच्या मनावर होणारा परिणाम, त्यावर स्वत:च उत्तर शोधण्यासाठी त्या व्यक्तीने स्वप्नात पाहिलेले जग सत्य मानणे या कल्पनेवर चित्रपटाचे कथानक गुंफले आहे.
अजिंक्य वर्तक योगायोगाने मानसोपचारतज्ज्ञ असणे, खऱ्या शशी देवधरचा छडा लावून शुभदाच्या मानसिक गोंधळातून तिला बाहेर काढण्यासाठी उपाय करणे, त्यासाठी शुभदाच्या मनात तयार झालेले घर, तिथल्या वस्तू याचा पटकथेत खुबीने वापर करून गूढ उकलणे या गोष्टी लेखकाने जबरदस्त ताकदीने मांडल्या आहेत. मध्यांतरापर्यंत शुभदा कोण, तिचे अस्तित्व काय, तिची जवळची माणसं कोण आहेत, कुठे आहेत या भोवती चित्रपट फिरतो आणि ते पाहताना प्रेक्षकही नकळतपणे शुभदाचे असे का झाले असेल, तिचे नातेवाईक तिला सापडतील की नाही याचा विचार करण्यात गुंतून राहतो. प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी ठरला आहे.
प्रत्येक चित्रचौकटीमधील रंगसंगती, वातावरण, कला दिग्दर्शन याबाबतीत चित्रपट उजवा ठरतोच. त्यासोबत पाश्र्वसंगीत आणि दोन अप्रतिम गाणी यामुळेही गूढ वातावरण कायम राखण्यात मदत होते.
सई ताम्हणकरने समर्थपणे जिवंत केलेली शुभदा ही प्रमुख व्यक्तिरेखा, संपूर्ण चित्रपटातील सईचा वावर, हावभाव, देहबोली, पूर्वीच्या प्रतिमेला छेद देऊन साकारलेले रूप यामुळे सई ताम्हणकर भाव खाऊन जाते. त्याला पूरक असा अभिनय अजिंक्य वर्तकच्या भूमिकेतून अजिंक्य देवने केला आहे. छायालेखन-संगीत आणि सर्व तांत्रिक बाजूंची उत्तम जोड मिळाल्यामुळे उत्तम कलाकृती पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकाला मिळतो.
सौ. शशी देवधर
निर्माता : शिल्पा शिरोडकर, अपर्णा रणजीत, कृष्णा शेट्टी, रत्नाकर शेट्टी
कथा, दिग्दर्शन – अमोल शेटगे
पटकथा- अमोल शेटगे, शर्वाणी-सुश्रुत
संवाद – कौस्तुभ सावरकर
छायालेखन – सुरेश देशमाने
संगीत – टबी-परिक
गीते – अश्विनी शेंडे, आशीष कुलकर्णी
कलावंत – सई ताम्हणकर, अजिंक्य देव, अविनाश खर्शीकर, तुषार दळवी, अनिकेत केळकर, अनुष्का रणजीत, अनिरुद्ध हरिप, शिल्पा गांधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा