हिंदी चित्रपटांमध्ये प्रत्येक दशकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार बदल झाले तसेच मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर चित्रपटांचे विषयही बदलत गेले. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर आता पुन्हा मागे वळून पाहण्याचा प्रयत्न आणि नकळत जुन्या फिल्म इंडस्ट्रीवरती भाष्य करण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांतून झाला आहे. याच प्रकारचा नीटस प्रयत्न ‘एक्स्पोज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी केला असून त्यात तो काही अंशी यशस्वी ठरला आहे. करमणूक करण्यात चित्रपट काही प्रमाणात यशस्वी ठरतो.
१९६०-७० च्या दशकातील मुंबईतील सिनेमासृष्टी, तेव्हाच्या कलावंतांच्या नखरे, अभिनेत्रींचे विभ्रम, स्टाइल एकुणातील तेव्हाचे वातावरण, कलावंत-निर्माते-दिग्दर्शक-तंत्रज्ञ- प्रसिद्धी करणारे लोक आणि एकुणातच त्या काळातील सिनेसृष्टीची झलक दाखवत दिग्दर्शकाने एका हत्येची उकल करणाऱ्या कथेच्या अनुषंगाने चित्रपट साकारला आहे.
रवीकुमार हा त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय नट आहे. तो पूर्वीचा पोलीस अधिकारी आहे. ‘स्टायलिंग आप करो, अ‍ॅटिटय़ूड मुझ पर छोड दो’ असे त्याचे ब्रीदवाक्य आहे. सिनेमा पुरस्कार सोहळा संपल्यानंतरच्या पार्टीत तो हजेरी लावतो आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. झारा आणि चांदनी या दोन नवोदित अभिनेत्री आहेत. मिळेल त्या सिनेमातून अंगप्रदर्शन करत पैसे कमाविणे, प्रसिद्धी मिळविणे हे झाराचे ध्येय आहे तर नायकाची बहीण, कधी नायिकेची मैत्रीण अशा भूमिका करून अभिनयात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न चांदनी करतेय. दोघी नवोदित असताना एकाच ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. सौंदर्याची आणि अभिनयाची दोन्हीची जुगलबंदी असल्यामुळे त्यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. केडी नावाचा एक तद्दन चाली चोरून संगीत देणारा एक संगीतकार आहे. आर्ट सिनेमाची प्रौढ दिग्दर्शिकेशी त्याचे लग्न झाले आहे. पडद्यावरच्या नायिकांबरोबर शय्यासोबत करणारा एक उच्चभ्रू उद्योगपती आहे, एक गल्लाभरू चित्रपटांचा दिग्दर्शक आहे आणि दुसरा त्याचा प्रतिस्पर्धी दिग्दर्शक आहे. अशा सर्व व्यक्तिरेखा, त्यांचे एकमेकांत गुंतलेले हितसंबंध, चित्रपट चालावा म्हणून वाट्टेल त्या क्लृप्त्या लढविण्याचा प्रयत्न करणारे दोन दिग्दर्शक, त्यांचा गोतावळा, विरमान शहा हा नवोदित अभिनेता, मिळेल त्या भूमिकांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करणारा रॉनी नावाचा दुय्यम नट, त्यांची स्पर्धा, पैसा-प्रसिद्धी-पुरस्कार मिळविण्यासाठी ६०-७० च्या दशकात दुय्यम, प्रमुख कलावंत यांची वागणूक, हेवेदावे असे सगळे दाखविताना एका पार्टीमध्ये झारा या नायिकेची हत्त्या होते. ही हत्या आहे की आत्महत्या या भोवती चित्रपट बेतला असून त्याद्वारे तेव्हाच्या हिंदी चित्रपटसृष्टीचे रंगढंग दाखवत, त्यावर टीका करत दिग्दर्शकाने चित्रपट साकारला आहे.
रवीकुमार ही व्यक्तिरेखा हिमेश रेशमियाने साकारली असून राजकुमार आणि राजेश खन्ना यांच्या व्यक्तिमत्त्वातील लकबींचा आधार घेऊन हा रवीकुमार साकारला आहे. तर झारा आणि चांदनी या व्यक्तिरेखा अनुक्रमे झीनत अमान आणि परवीन बाबी यांच्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित आहेत, असे चित्रपट पाहताना जाणवते. त्या पुष्टय़र्थ दिग्दर्शकाने खुबीने ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करणारी ओलेती झारा दाखवली आहे. परंतु, दिग्दर्शकाने थेट कुठेही या व्यक्तिरेखांचा संबंध वास्तवातील व्यक्तींशी जोडलेला नाही. परंतु, प्रेक्षक नकळतपणे वास्तवातील कलावंतांशी चित्रपटातील व्यक्तिरेखांची सांगड घालण्याचा प्रयत्न करील, किंबहुना त्याने तसा प्रयत्न करावाच अशा पद्धतीने चित्रपट केला आहे. एका बाजूने एका अभिनेत्रीच्या हत्येची उकल आणि दुसऱ्या बाजूने १९६५ ते १९७०च्या कालावधीत मुंबईतील हिंदी सिनेमासृष्टीतील वातावरण, तेव्हाचे लोकांचे वागणे-बोलणे याची चांगली झलक दाखवली आहे. रंजकता आणि गूढतेची उकल यामुळे उत्कंठावर्धक चित्रपट ठरतो.
हिमेश रेशमियाने रवीकुमार बेतास बात साकारला असून अन्य सर्व कलावंतांनी चांगले काम केले आहे.

एक्स्पोज
निर्माता – विपीन रेशमिया
दिग्दर्शक – अनंत नारायण महादेवन
लेखन, संगीत – हिमेश रेशमिया
कलावंत – हिमेश रेशमिया, सोनाली राऊत, झोया अफरोज, यो यो हनी सिंग, इरफान खान, राजेश शर्मा,  दया शंकर पांडे, आदिल हुसैन व अन्य.

Story img Loader