प्रेम हा टॉपिक काही चित्रपटसृष्टीचा आवडता विषयच जणू, चित्रपटासाठी विषय नाही मिळाला तर एकतर कॉमेडी नाहीतर प्रेम यावर चित्रपट काढून मोकळ व्हायचं. असचं काहीस समीकरण आज (शुक्रवारी) प्रदर्शित झालेल्या ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ चित्रपटात पाहायला मिळत. प्रेमावर चित्रपट कोणाला पहायला आवडत नाहीत. तरुणाईचा चांगला प्रतिसाददेखील अशा चित्रपटांना मिळतो. म्हणून अगदीच काहीतरी बनवून टाकायचं असं तर नाही ना.
‘खूप उशीर होण्यापूर्वी आपलं प्रेम व्यक्त करा’ अशी टॅगलाइन असलेल्या ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ चित्रपटाची कथा ही इंद्रनील आणि अदिती यांच्यावर आहे. स्वतःच्या मनाला समाधान मिळेल असचं काम करणा-या इंद्रनीलला वॉल पेन्टिंगची आवड असते. पण त्यापलीकडे नील दुसर काहीचं करत नसतो. तर दुसरीकडे. इंद्रनीलच्या बहिणीची मैत्रीण अदिती ही कर्तबगार मुलगी असते. गोव्याहून मुंबईला आलेल्या अदितीला इंद्रनील म्हणजेच नीलच्या कलेविषयी आणि फोटोग्राफीच्या आवडीबाबत कळत. या गोष्टी केवळ आवडीपुरता मर्यादित न ठेवता त्याने आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा सल्ला अदिती त्याला देते. त्यानंतर नील अदितीच्या प्रेमात पडतो पण तिला हे सांगण्याअगोदरच ती गोव्याला निघून गेलेली असते. आपल्याला अदितीबद्ल काय वाटतं हे तिला कळलचं पाहिजे हा विचार मनात असलेला नील त्याच्या मित्रासोबत (गोली) गोव्याला जातो. गोव्याला जाताच नील त्याच्या मनातल्या भावना अदितीला सांगतो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो. मात्र, नीलपेक्षा पाच वर्षांनी मोठी असलेली अदिती त्याला नकार देते. अजिबात न रागवता ती नीलला समजवते. माझं लग्न ठरलं आहे आणि मी तुझ्यासोबत नाही येऊ शकतं. तेव्हाच नीलपासून लांब न जाण्याचा निर्णय न घेता त्याच्यासोबत मैत्री ठेवते. मैत्रीच्या नात्याने अदिती त्याला गोवा फिरवण्यास नेते. त्यांच्या या एकत्र फिरण्याला अदितीचा भाऊ जास्तच मनावर घेतो. गोव्यात दरारा असलेला अदितीचा भाऊ नीलला आपल्या गुंडाना मारायला सांगतो. अखेर अदिती आपलं लग्न तोडून नीलकडे आपल्या प्रेमाची कबुली देते.
दिग्दर्शकाने लवकर चित्रपट गुंडाळण्याच्या नादात जरा जास्तच गडबड केलीयं असं वाटतयं. हिरोने हिरोईनकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर केवळ मैत्री म्हणून त्याच्यासोबत फिरायचं. मग काय या नादात त्या हिरोनेच मार खायाचा. तेव्हा कुठे जाऊन हिरोईनला आपल्या प्रेमाची प्रचीती येणार. या सगळ्यात मात्र त्या बिचा-या हिरोचे हाल, हेच या चित्रपटात पहायला मिळत. चित्रपटाची कथा नाही पण निदान लोकेशन्स तरी मनाला भावणारे असावेत. सारखा सारखा दिसणारा एकच समुद्रकिनारा आणि चर्च याव्यतिरीक्त जास्त लोकेशनचा वापर करण्यात आलेला नाही. चला कथा, लोकेशन्स हे तर जाऊ द्या चित्रपटाला दमदार बनवतो तो त्यातील कलाकारांचा अभिनय. इंद्रनील आणि अदितीची भूमिका गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठेने साकारली आहे. श्रुतीने तिच्या भूमिकेला साजेसा असा अभिनय केला आहे. गौरव घाटणेकरने श्रुतीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाची भूमिका केली खरी पण त्याच्या अभिनयातही अपरिपक्वता जाणवली. इंद्रनीलच्या मित्राची भूमिका करणा-या गोलीला त्याच्यापेक्षा चांगला अभिनय जमत होता असचं काहीस दिसत होत. त्यामुळे गौरवने सध्या तरी स्वसमाधानापुरते काम न करता इतरांचाही विचार करावा. प्रेमापुढे जात, धर्म, वय, वर्ण हे सारं गौण असतं. प्रेम हे प्रेम असतं. हे सांगण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला जणू. पण हा केवळ प्रयत्नचं होऊन राहिला. एक साधा सरळ चित्रपट बनवण्याच्या नादात हिरो-हिरोईनला मॉल आणि समुद्रावर फिरवण्यातच संपूर्ण वेळ घालवण्यात आला आहे. एकंदर ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ हा चित्रपट निव्वळ एक टिपीकल लव्ह स्टोरी सांगणारा चित्रपट झाला आहे.
चित्रनगरीः ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’
प्रेमावर चित्रपट कोणाला पहायला आवडत नाहीत. तरुणाईचा चांगला प्रतिसाददेखील अशा चित्रपटांना मिळतो.
First published on: 20-06-2014 at 09:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review tujhi majhi love story